ब्रह्मनंद जाधवबुलडाणा, दि. ३१- पश्चिम वर्हाडात यावर्षी झेंडू फुलाचे उत्पादन वाढले; मात्र यामुळे झेंडू फुलांच्या भावात मोठी घसरण झाली असून, सरासरी ५ ते १0 रुपये प्रतिकिलोचा भाव झेंडूला मिळाला.दसरा व दिवाळी या दोन सणांमध्ये एकराला जवळपास ३८ क्विंटल झेंडूचे उत्पादन झाले. यामध्ये एका एकराला सरासरी खर्च ३५ हजार रुपये लागला असून, उत्पादन मात्र ३0 हजार रुपयांपर्यंतच झाले. यावर्षी पश्चिम वर्हाडातील झेंडूच्या शेतीचा ताळेबंदच तोट्यात गेल्याने दसर्याबरोबर दिवाळीतही झेंडू उत्पादकांच्या पदरात निराशेचे फूल पडले. यावर्षी झेंडू पिकाला असलेले पोषक वातावरण मिळाल्याने झेंडूचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर झाले. बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणावर झेंडूचे उत्पादन घेतले. दसरा सणाला झेंडूची आवक वाढल्याने भाव पडले. परिणामी, झेंडू उत्पादक शेतकर्यांना केवळ ५ रुपये प्रतिकिलोने झेंडूची विक्री करावी लागली, तर दिवाळी सणाला झेंडूच्या दुसर्या तोडणीमध्ये एकरी सरासरी १५ क्विंटल झेंडूचे उत्पादन झाले; मात्र दिवाळीतही शेतकर्यांना झेंडूचे भाव १0 रुपये प्रतिकिलोच मिळाले, तर विक्रेत्यांनाही १0 ते १५ रुपये किलोने झेंडूची विक्री करावी लागली. त्यामुळे विक्रेते व शेतकरी दोघांनाही दसर्यापाठोपाठ दिवाळीमध्येही झेंडूच्या फुलातून तोटाच सहन करावा लागला. परजिल्ह्यातील आवक झाली बंद!पश्चिम वर्हाडातील बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यामध्ये दसरा व दिवाळीला परजिल्ह्यातून झेंडूच्या फुलाची आवक होत होती; परंतु यावर्षी पश्चिम वर्हाडातच झेंडूची आवक वाढली व त्याला भावही पाहिजे तेवढा मिळत नाही. त्यामुळे वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने यावर्षी परजिल्ह्यातील झेंडूची आवक बंद झाली होती. अत्यल्प भाव असल्यामुळे शेतकर्यांनी उत्पादीत केलेल्या झेंडूची विक्री स्थानिक बाजारातच केली. लाखोंची उलाढाल आली हजारोंवरगेल्या तीन वर्षांपासून झेंडूला ७0 ते १00 रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळत गेले. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झेंडूच्या फुलांच्या बाजारात दसरा व दिवाळीला लाखोंची उलाढाल होत होती; मात्र यावर्षी पहिल्यांदाच झेंडूला ५ ते १0 रुपये किलोचा भाव आल्याने लाखोंची उलाढाल हजारोवर येऊन ठेपली. झेंडूला मातीमोल भाव मिळत असल्याने झेंडूच्या उत्पादनासाठी लागलेला खर्चही भरून निघणे अवघड झाले. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकर्यांनी स्वत: रस्त्यावर बसून झेंडूची विक्री केली.
झेंडू उत्पादकांच्या पदरात निराशाच!
By admin | Published: October 31, 2016 11:23 PM