अकोला: विवाहितेचा मृत्यू नैसर्गिक नसून, पती व सासूने केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचा आरोप माहेरकडील नातेवाईकांनी केल्यामुळे रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी दुपारी विवाहितेचा गडंकी स्मशानभूमीमध्ये पुरलेला मृतदेह न्यायालयाची परवानगी घेऊन बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन केले. दहीहांडा वेसजवळ राहणारे शेख बशीर शेख हबीब (३६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण तहेरीन तबस्सुम मोहम्मद उजेर (३१) हिचा विवाह ४ जानेवारी २00४ रोजी मोमीनपुर्यातील मोहम्मद उजेर हाफीज गुलाम मोहम्मद (४0) याच्यासोबत झाला होता. तहेरीनला एक मुलगी व दोन मुले आहेत. बहिणीला पती व सासू किरकोळ कारणांवरून त्रास देत होते. पती मोहम्मद उजेर याने घर बांधण्यासाठी तहेरीनला माहेरावरून तीन लाख रुपये आणण्यास सांगितले होते. माहेरकडील नातेवाईकांनी रक्कम दिली नाही; परंतु दरमहा मुलांच्या शिक्षणाचा खर्च देण्यात येत होता. २७ जानेवारी रोजी मोहम्मद उजेर याने घरी येऊन तहेरीन आजारी असल्याचे सांगितले होते आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पतीकडील व माहेरकडील नातेवाईकांनी तिचा अत्यसंस्कारही केला; परंतु तहेरीनची मुलगी ऐतन जाहेरा हिने तिच्या आईला २३ जानेवारीला मोहम्मद उजेरने बेदम मारहाण केली होती. त्यात ती खाली कोसळली होती, अशी माहिती सांगितल्याने माहेरच्यांना संशय आला. तहेरीनचा मृत्यू नैसर्गिक नसून, पती व सासूने केलेल्या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप शेख बशीर यांनी केला.शेख बशीरच्या तक्रारीमुळे रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी गडंकी स्मशानभूमीत पुरलेला तहेरीनचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. सध्या पोलिसांनी तहेरीनच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पती व सासूच्या मारहाणीत विवाहितेचा मृत्यू
By admin | Published: January 30, 2015 1:37 AM