अकोला : मागील तेरा दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची खरेदी-विक्री बंद होती. त्यामुळे सोमवारी बाजार समिती सुरू होताच गर्दी होण्याची शक्यता होती. त्यानुसार बाजार समितीने नियोजन केले होते; मात्र सोमवार व मंगळवार दोन्ही दिवस आवक कमीच होती. अपेक्षेप्रमाणे आवक झाली नाही. दोन दिवसांमध्ये जवळपास ७ हजार ९९६ क्विंटल मालाची आवक झाली होती.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ९ मे पासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांजवळ असलेल्या उन्हाळी मालाची विक्री करण्यासाठी अडचण येत होती. शेतकऱ्यांचा कांदा, भुईमूग पडून आहे. काही मोठ्या कास्तकारांकडे सोयाबीन, हरभरा देखील शिल्लक होता. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देत १६ मेपासून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र, कृषी उपयोगी वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू ठेवण्याची सूट दिली; परंतु बाजार समिती २२ मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. पुढील खरीप हंगाम पाहता राहिलेला माल विकण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. दरम्यान, काही शेतकरी व्यापाऱ्यांना माल विक्री करून मोकळे झाले. २४ मेपासून बाजार समितीचे व्यवहार सुरू झाले. पहिल्या दिवशी माल विक्रीसाठी गर्दी होण्याची शक्यता पाहता बाजार समिती प्रशासनाने नियोजन केले होते; परंतु अपेक्षेप्रमाणे मालाची आवक झाली नाही. दोन दिवसांमध्ये आठ हजार क्विंटल शेतमालाची आवक झाली.
सोमवारी झालेली आवक
४,२४८ क्विंटल
मंगळवारी झालेली आवक
३,७४८ क्विंटल
दोन दिवसांत धान्याची आवक
४,७४६ क्विंटल
हरभरा व तुरीची आवक सुरूच
खरीप हंगाम जवळ आला आहे. असे असताना बाजार समितीत हरभरा व तुरीची आवक सुरूच आहे. शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी उरलासुरला माल विक्री करीत आहेत. मंगळवारी हरभरा ६३९ क्विंटल तर तुरीची ९५८ क्विंटल आवक झाली होती.