कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे ब्रेक द चेनअंतर्गत जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कडक निर्बंधांच्या काळात जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. कृषी अवजारे, कृषी सेवा केंद्र व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने पूर्णपणे बंद आहे. तथापि, शेतकऱ्यांना आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित कृषी सेवक व तालुका स्तरावर संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. बाजार समित्या बंद असल्याने माल विक्रीची अडचण निर्माण झाली आहे. उन्हाळी पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा माल घरीच पडून आहे. समोर खरीप हंगाम असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यात माल विकता येत नसल्याने खरिपाची पेरणी करावी तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
--बॉक्स--
दररोज होती सहा-सात हजार क्विंटल आवक
कडक संचारबंदीआधी शहरातील बाजार समितीमध्ये दररोज सहा-सात हजार क्विंटल मालाची आवक होती; परंतु बाजार समिती बंद असल्याने ही आवक बंद आहे. यामध्ये हरभरा, तूर, सोयाबीनची सर्वाधिक आवक होती.
--बॉक्स--
जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने भुईमूग व उन्हाळी सोयाबीन पडून आहे. खरिपाच्या तयारीसाठी भांडवलाची गरज आहे. माल विक्री करता येत नसल्याने अडचण होत आहे.
- किशोर नागरे, शेतकरी