अकोला : नाफेडच्या खरेदी केंद्रावर व्यापार्यांशी संगनमत करू न शेतकर्यांना लुटणार्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त केल्या जाणार असल्याचा इशारा राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शनिवारी येथे दिला.शासनाच्या उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या उपक्रमांतर्गत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील स्व. डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात आयोजित कार्यशाळेत कृषी मंत्री बोलत होते. कार्यक्रमाला कृषी विभागाचे विभागीय संयुक्त संचालक एस.आर. सरदार, डॉ. पंदेकृविचे प्रभारी कुलगुरू डॉ. विलास भाले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संचालक संशोधन डॉ. दिलीप मानकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुरेश बाविस्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.उन्नत शेती योजनेवर बोलताना कृषी मंत्र्यांनी शेतकर्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त उत्पादन आणि उत्पन्न कसे वाढेल, यावर भर देण्यात आला असल्याचे सांगितले. याकरिता कृषी विभागाने विविध कार्यक्रम येत्या खरीप हंगामात राबविण्याचे ठरविले आहे. आता थेट कृषी विभाग ते शेतकरी असा संवाद राहणार असून, शेतकर्यांनी यंत्र खरेदी करायचे, कृषी विभाग त्यांना अनुदानाचा धनादेश देईल. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळामार्फत कृषी अवजारांची खरेदी बंद करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी सव्वाकोटी शेतकर्यांनी पंतप्रधान पीक विमा काढला होता. यावर्षी तो दीड कोटींपर्यंत नेण्याचा संकल्प केला आहे. मागील वर्षी पंतप्रधान पीक विमा काढण्यात देशात जालना जिल्हा प्रथम आला होता. यावर्षी प्रत्येक जिल्हय़ात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांचेही प्रबोधन केले जाणार आहे. रोहिणी नक्षत्रापासून राज्यात शेती जनजागृती पंधरवडा साजरा केला जाणार असून, शेतकर्यांना शेती, प्रक्रिया, उद्योगाची इत्थंभूत माहिती शेतकर्यांना दिली जाणार आहे.बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतमालासाठी गोदामे उभारणार असून, आठ हजार कांदा चाळी उभारण्याचे नियोजन केले असल्याचे ते म्हणाले. शेतकर्यांचा शेतमाल, सीताफळ कृषी विभाग खरेदी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक सरदार यांनी केले. यावेळी कृषी मंत्र्यांच्या हस्ते शेतकर्यांना धनादेश दिले.यावेळी गौतम शिरसाट या शेतकर्याला व कृषी यांत्रिकीकरणांतर्गत ट्रॅक्टर व पीक कापणी यंत्रासाठी रवींद्र गोपनारायण यांना कृषी मंत्र्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. आत्मा एमएसीपी अंतर्गत शेतकरी सामुदायिक उत्पादन सुविधा उभारण्याकरिता कृषिरत्न फार्म व हिरकणी फार्म यांच्या प्रतिनिधींनाही धनादेशाचे वितरण करण्यात आले.खारपाणपट्टय़ाची समस्या सोडविण्यासाठी जागतिक बँकेचे साह्य-अमरावती व अकोला जिल्हय़ातील सुमारे एक हजार गावातील खारपाणपट्टय़ाची समस्या सोडविण्यासाठी जागतिक बँकेने सुमारे चार हजार कोटींचा प्रकल्प मंजूर केला आहे. या माध्यमातून खारपाणपट्टय़ातील जमिनीतील क्षार काढून जमीन सुपीक केली जाणार आहे. शेतकर्यांनी कोणत्याही परिस्थिती निराश होऊ नये. शासन सदैव खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहील, असा दिलासा कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी शेतकर्यांना द्यावा, अशी सूचनाही फुंडकर यांनी केली.
व्यापा-यांशी संगनमत करणार्या बाजार समित्या बरखास्त करणार!
By admin | Published: April 23, 2017 1:35 AM