--------------------------------------
पूर्णा नदीपात्रातून रेतीची खुलेआम वाहतूक
महसूल विभागाचे दुर्लक्ष: कारवाई करण्याची मागणी
हाता: बाळापूर तालुक्यातील हाता परिसरात पूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. भरदिवसा रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याने महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.
हाता परिसरातील अंदूरा, सागद, नागद, बोरगाव, दगडखेड, मोखा, जानोरी आदी गावांमध्ये पूर्णा नदीपात्रातून रेतीची चोरी होत आहे. जिल्ह्यात रेती घाटांचा लिलाव न झाल्याने रेती माफियांकडून अव्वाच्या सव्वा दराने रेतीची विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. सध्या परिसरातील गावांमध्ये घरकूल व विविध बांधकामे सुरू आहेत. बांधकामासाठी रेतीची आवश्यकता असल्यामुळे रेतीमाफियांकडून भरदिवसा रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक केल्या जात आहे. गावात सुमारे ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांमध्ये विक्री होत आहे, तर बाहेरगावी पाच हजार ते सहा हजार रुपये याप्रमाणे विक्री होत आहे. पूर्णा नदीपात्रातून ट्रॅक्टर, ट्रकद्वारे रेती वाहतुकीचा सपाटा लावल्यामुळे पूर्णा नदीपात्रात खड्डे पडले आहेत. भरदिवसा अवैध उत्खनन होत आहे; मात्र महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. शेकडो ब्रास रेतीची चोरी होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गत आठवड्यात उरळ पोलिसांनी बोरगाव वैराळे, हातरुन येथे कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत. मात्र सद्य:स्थितीतही रेती अवैध वाहतूक सुरूच आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.
---------------------------------------------
नदीपात्रात पडले खड्डे
हाता परिसरात पूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच नदीकाठच्या शेतीला धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.