विवेक चांदूरकर / अकोला: यावर्षी शेती व्यवसायात असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर पडला आहे. सराफा, कापड व भाजीपाला आदी व्यवसायांवर अवकळा पसरली आहे. शेतकर्यांची अवस्था दयनीय झाल्यामुळे बाजारपेठेतील आत्माच हरविला आहे. त्यातच गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान केले. यामुळे झालेल्या भाववाढीने सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे. २0१४ - १५ वर्षातील खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे फळबागा, भाजीपाला उत्पादकांसह सर्वच शेतकर्यांना नुकसानाचा सामना करावा लागला असून, शेती व्यवसाय डबघाईस आला. याचा थेट परिणाम बाजारपेठेवर पडला. धान्य बाजारासह सोने व कापड विक्रेत्यांनाही यावर्षी मंदीचा सामना करावा लागत आहे. शेतकर्यांसोबतच व्यापारीही त्रस्त झाले आहेत. सोन्याचे भाव कमी होत असल्यामुळे गुंतवणूक म्हणून कर्मचार्यांनी याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सराफा व्यवसाय यावर्षी विवाह सोहळे व शेतकर्यांवरच प्रामुख्याने निर्भर होता; मात्र शेती व्यवसायातील नुकसानामुळे सोने खरेदी-विक्रीत २0 ते ३0 टक्क्यांनी घट आली आहे. कापड व्यवसायावरही मंदीचे सावट जाणवत आहे. कापड व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कापड विक्रीत १0 ते १५ टक्के घट आली आहे. विवाह सोहळ्यांकरिता महागडे व मोठय़ा प्रमाणात कपड्यांची खरेदी करण्यात येते; मात्र ग्रामीण भागात यावर्षी विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आल्यामुळे वस्त्रांची खरेदी कमी झाली आहे. गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. भावात वीस ते तीस टक्के वाढ झाल्याचा थेट प्रभाव सामान्य ग्राहकांच्या खिशावर पडत आहे. जिल्ह्यातील भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून आयात करावी लागत आहे. मोठे व्यावसायिक, किरकोळ दुकानदारांसह ग्राहकांनाही दुष्काळाची झळ बसत आहे.
बाजारपेठेवर अवकळा
By admin | Published: March 17, 2015 1:05 AM