संतोष येलकर
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत १ कोटी २० लाख रुपयांची दुधाळ जनावरे वाटपाची योजना राबविण्यात येत असून, त्यासाठी लाभार्थींची निवड करण्यात आली आहे; मात्र कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर गुरांचे बाजार बंद असल्याने, दुधाळ जनावरांची खरेदी प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे कोरोना काळात जिल्ह्यातील लाभार्थींना दुधाळ जनावरांचे वाटपही रेंगाळले आहे.
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत २०२०-२१ या आर्थिक वर्षात मागासवर्गीय लाभार्थींसाठी १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून दुधाळ जनावरे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. शंभर टक्के अनुदानावर राबविण्यात येत असलेल्या या योजनेत लाभार्थींना प्रत्येकी दोन म्हशी खरेदीसाठी ८० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. त्यानुषंगाने योजनेंतर्गत जिल्ह्यात ९५ लाभार्थींची निवड जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आली. लाभार्थींना म्हशींचे वाटप करण्यासाठी जिल्ह्याबाहेरील गुरांच्या बाजारात म्हशींची खरेदी करण्यात येते. परंतु कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शासनामार्फत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, त्यामध्ये गुरांचे बाजार बंद आहेत. त्यामुळे दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत दुधाळ जनावरांची खरेदी बंद असून, योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील लाभार्थींना दुधाळ जनावरे वाटप करण्याच्या प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला आहे.
‘या’ ठिकणच्या बाजारातून
म्हशींची करण्यात येते खेरदी !
दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना म्हशींचे वाटप करण्यासाठी जिल्ह्याबाहेरील गुरांच्या बाजारातून म्हशींची खरेदी करण्यात येते. त्यामध्ये जिल्ह्यानजीकच्या अमरावती, बडनेरा, खामगाव व मालेगाव इत्यादी ठिकाणच्या गुरांच्या बाजारात म्हशींची खरेदी करण्यात येते; मात्र कोरोना काळात गुरांचे बाजार बंद असल्याने म्हशींची खरेदी रखडली आहे.
लाभार्थींना प्रतीक्षा !
दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना म्हशी खरेदीचे अनुदान मंजूर करण्यात आले. परंतु कोरोना काळात बाजार बंद असल्याने म्हशींची खरेदी प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे गुरांचे बाजार केव्हा सुरु होणार आणि म्हशींची खरेदी प्रक्रिया केव्हा सुरू, याबाबत योजनेंतर्गत लाभार्थींकडून प्रतीक्षा केली जात आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर गुरांचे बाजार बंद असल्याने दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत म्हशींची खरेदी प्रक्रिया रखडली आहे. बाजार सुरू झाल्यानंतर योजनेंतर्गत जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या लाभार्थींसाठी म्हशींची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
आकाश शिरसाट
सभापती, समाजकल्याण, जिल्हा परिषद.