अकाेला: आधीच दुष्काळ, नापिकी वा कर्जबाजारी झाल्याने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या डाेक्यावर काेराेनाच्या संकटाचाही बाेजा पडला आहे. काेराेनाच्या नियमांमध्ये शेती काम व शेतमाल विक्रीची सवलत असली तरी सर्व अर्थचक्रच ठप्प झाल्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसलाच आहे. अशा स्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलीच्या लग्नकार्यासाठी बाळापूर येथील मुरलीधर राऊत यांनी माेफत मंगल कार्यालय व पाहुण्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेचा भारही उचलण्याचा संकल्प केला आहे. काेराेनाच्या नियमांचे काटेकाेर पालन करून साेमवारी अशाच एका शेतकरी कन्येचा विवाह बाळापुरात पार पडला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वर अकाेला ते बाळापूर दरम्यान मुरलीधर राऊत यांचे हाॅटेल आहे. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी पाहुण्यांच्या जेवणासह हाॅल व लाॅन्सची माेफत सेवा देण्याचे जाहीर केले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाह साेहळ्यासाठी ते कार्यवाहक बनले आहेत. नव्याने तयार केलेल्या त्यांच्या हाॅटेलमध्ये त्यांनी दहा हजार स्क्वेअर फुटांचा लाॅन, खाेल्या, सभागृह उभारले आहे. हे सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी विनामूल्य उपलब्ध करून देत आहेत. काेराेना नियमांमुळे विवाहावरच निर्बंध आले आहे. अशा स्थितीत केवळ २५ वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत पारस येथील गायत्री विशाल काटे हिचा विवाह खामगाव तालुक्यातील खुटपुरीचे निलेश सुधाकर गाेळसे यांच्याशी संपन्न झाला. वधू गायत्री हिच्या वडिलांनी २०१३ मध्ये आत्महत्या केली हाेती. तिला एक भाऊ व बहीण आहे. आई उदरनिर्वाहासाठी घरकाम करते. त्यामुळे या कन्येच्या विवाहाचा पूर्ण खर्च राऊत यांची उचलला. या साेहळ्याला बाळापूरचे उपविभागीय अधिकारी डाॅ. रामेश्वर पुरी आवर्जून उपस्थित हाेते.
पंतप्रधानांनी घेतली हाेती कार्याची दखल
मुरलीधर राऊत यांनी नाेटा बंदीच्या काळात महामार्गावरून जाणाऱ्यांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली हाेती. त्यांचा या उपक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख केला हाेता. त्यानंतर राऊत यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले हाेते.
------------------
काेट
शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना अनेक संकटांचा सामना करावा लागताे. याची जाणीव असल्यामुळे मी सामाजिक दायित्चाच्या भूमिकेतून आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या लग्न कार्याची जबाबदारी घेतली आहे. काेराेनाच्या संकटातही या जबाबदारीला पूर्ण करू शकलाे याचे समाधान आहे.
-मुरलीधर राऊत, बाळापूर