अकोला, दि. १: आधीच लग्न झालेले. त्यात पुन्हा दुसर्यांदा पत्नीसोबतच लग्न करून शासनाच्या योजनेतून दहा हजार रुपयांची रक्कम लाटणार्या दाम्पत्याला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी जय मो. सिंघानिया यांच्या न्यायालयाने बुधवारी सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. शहरातील संतोष रामदास सावंत (३२) आणि त्याची पत्नी छाया सावंत (२८) यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे २00४ मध्ये अशोक वाटिकेत विवाह केला. त्याची नोंदणीही त्यांनी केली. २00८ मध्ये बाभुळगाव जहागीर येथील एका सामाजिक संस्थेने सामूहिक विवाह समारंभाचे आयोजन केले होते. विवाह करण्यासाठी शासनाकडून नवदाम्पत्यास प्रोत्साहन योजनेतून दहा हजार रुपयांची मदत दिली जाते. या कारणामुळे विवाहित दाम्पत्याने सामूहिक विवाह सोहळय़ामध्ये सहभागी होऊन दुसर्यांदा विवाह करून महिला व बालकल्याण विभागाकडून दहा हजार रुपयांची रक्कम लाटली; परंतु पुढे ही महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी अर्चना इंगोले यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी दामप्त्याविरुद्ध १२ मे २0११ रोजी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली. त्यानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ४२0, ४६७, ४६८ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपी संतोष सावंत व त्याची पत्नी छाया यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने, न्यायालयाने दोघांनाही कलम २४८ प्रमाणे प्रत्येकी सहा महिन्यांचा साधा कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील एन.एन. काळे यांनी बाजू मांडली.
विवाहित दाम्पत्याने दुस-यांदा लग्न करून लाटली शासनाची रक्कम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2016 2:04 AM