अकोला, दि. ३0- काश्मीरमधील हिमस्खलनात जिल्हय़ातील शहीद दोन जवानांचे पार्थिव मंगळवारी दुपारपर्यंंत अकोल्यात पोहोचण्याची शक्यता असून, दोन्ही जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.अकोल्यातील वाशिम रोडस्थित पंचशील नगरमधील जवान आनंद शत्रुघ्न गवई आणि मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील संजय सुरेश खंडारे या दोन जवानांना गत २५ जानेवारी रोजी वीरमरण आले. १३ महार बटालियनचे जिल्हय़ातील दोन जवान शहीद झाल्याने, जिल्हय़ात शोककळा पसरली आहे. दोन्ही शहीद जवानांचे पार्थिव सोमवारी श्रीनगरमध्ये पोहोचले असून, शवविच्छेदन करण्यात आले. श्रीनगर येथून विमानाने शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात येणार आहेत. दिल्ली येथून विमानाने त्यांचे पार्थिव नागपूर येथे पोहोचणार आहेत व नागपूर येथून शासकीय वाहनाने शहीद जवानांचे पार्थिव मंगळवारी दुपारपर्यंंत अकोल्यात पोहोचणार आहेत. त्यामध्ये संजय खंडारे यांचे पार्थिव माना येथे आणि आनंद गवई यांचे पार्थिव अकोला येथे पोहोचणार आहे. त्यामध्ये संजय खंडारे यांच्या पार्थिवावर माना येथे तर आनंद गवई यांच्या पार्थिवावर अकोल्यातील गीतानगर स्थित स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहीद जवानांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहिदांचे पार्थिव आज पोहोचणार!
By admin | Published: January 31, 2017 2:27 AM