- संजय उमकलोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : तालुक्याला स्वातंत्र्यपूर्व प्राचीन इतिहास नसला तरी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यात या तालुक्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तालुक्यात शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले श्रम खर्ची घातले, तर काहींनी आपले बलिदान दिले. या हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला येथील हुतात्मा स्तंभ आता काहीसा अडगळीत पडल्याने दुर्लक्षित झाला आहे. 'जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्ये झाले' असे म्हटले जात असले तरी त्याच्या बलिदानाच्या स्मरणार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तत्कालीन हुतात्मा स्तंभ उभा आहे. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर भारताची २५ वर्षे पूर्णत्वास झाल्या निमित्ताने तालुक्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ येथील (छत्रपती शिवाजी महाराज चौक) जयस्तंभ चौकात १५ ऑगस्ट १९७२ ते १४ ऑगस्ट १९७३ दरम्यान भारत सरकारने हुतात्मा स्तंभ उभारला आहे, या स्तंभावर समोरच्या बाजूला भारताचे संविधान (प्रस्ताविका) कोरली आहे तर दुसऱ्या बाजूला २० हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत. ९ ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून देशभर सर्वत्र साजरा केल्या जातो. त्यातही स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आठवडाभर देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, परंतु मूर्तिजापूरात हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभाकडे प्रशासनाचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. हा हुतात्मा स्तंभ अडगळीत पडला असून, त्याच्या भोवती इतर अतिक्रमण असल्याने हा स्तंभ दृष्टीस येत नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना प्रशासनाने साधे पुष्पार्पण करण्याची सहानुभूती दाखवली नाही. भोवताली झालेल्या अतिक्रमणामुळे या हुतात्मा स्तंभाचा जीव गुदमरतोय यातून मला वाचवा अशाच भावना हा स्तंभ व्यक्त करीत असावा. यांनी पत्करले हौतात्म्य
सोमाणी माणिकलाल भुरामले (माना ), माळी गोविंद केवजी (जामठी), भुयार गणपत सुर्यभान (कुरुम), मानकर विठू गोविंदा (जामठी), नारायणसिंग भिमसिंग (मूर्तिजापूर), देशमुख विनायकराव केशवराव (सिरसो), राऊत नारायण राघोसा (कुरुम), मेहरे बळीराम लक्ष्मण (सिरसो), देशमुख विश्वासराव काशीराव (कुरुम), शामसा सोनासा (कुरुम), दौलत मोतीराम (कुरुम), देशमुख वामन बळीराम (कुरुम), किसनसिंग भिमसिंग (कुरुम), शिवराम रामजी (जामठी), अभिमान धर्माजी (जामठी), नारायण गणपत (जामठी), देशमुख हिम्मतराव जयवंतराव (माना), धोबी बळीराम शिवराम (माना), दिल्या गंफा (माना), आगरकर नेभीनाथ शांतीनाथ (मूर्तिजापूर)