- अतुल जयस्वाल
अकोला : चार महिन्यांपूर्वी उच्च पातळीवर असलेली कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता पूर्णत: ओसरल्याने नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, मास्क वापराबाबत अनेक जण उदासीन दिसून येत आहेत. पूर्वी भीतीपोटी किमान हनुवटीवर मास्क लावणारे आता चक्क गर्दीतही विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. रुग्णसंख्येचा आलेख उतरल्याने प्रशासनही सुस्त झाले असून, विनामास्क फिरणाऱ्यांवरची कारवाईही थंडावली आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी दररोज थोड्या फार प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेतच. सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली असून, नागरिकांचे एकमेकांत मिसळण्याचे प्रमाणही वाढले आहे. तथापी, कोरोना टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर या त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी बाजारपेठ किंवा गर्दीच्या ठिकाणी कारवाई किंवा कोरोनाच्या भीतीने लोक मास्क वापरत होते. आता मात्र ८० टक्के लोक विनामास्क फिरताना दिसून येत आहेत.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई थंडावली
कोरोना संसर्ग उच्च पातळीवर होता, तेव्हा पोलीस व मनपाच्या संयुक्त पथकाकडून मास्क नसलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात होती.
आता कोरोना नियंत्रणात आल्याने शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा धडाका कमी झाला आहे. कारवाईचा धाक नसल्याने नागरिकांमध्ये मास्क वापराबाबत उदासीनता वाढली आहे.
६१ जणांवर कारवाई
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस व मनपाचे संयुक्त पथक आहे. कोरोना आलेख घसरल्याने कारवाईचा वेग मंदावला असला, तरी गत आठवडाभरात शहरात विविध ठिकाणी ६१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
कारवाई का थंडावली?
मास्क न वापरणे व इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करणे सुरूच आहे. यासाठी पोलीस व मनपाचे संयुक्त पथक कार्यरत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडल्यावर सार्वजनिक ठिकाणी मास्क लावून सहकार्य करावे.
- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, अकोला