अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाच्या फेज क्रमांक ३ मध्ये असलेल्या भारत आॅइल इंडस्ट्रीजला सोमवारी पहाटे आग लागण्याची घटना घडली. या भीषण आगीत लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाले असून, महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाद्वारे या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.शहरातील रहिवासी बिलाल मुन्शी यांच्या मालकीची एमआयडीसीत फेज क्रमांक ३ मध्ये भारत आॅइल इंडस्ट्रीज आहे. दरम्यान, सोमवारी पहाटे इंडस्ट्रीजच्या काही साहित्याला अचानक आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे कामगारांमध्ये धावपळ सुरू झाली. आगीने रौद्ररूप धारण करताच इंडस्ट्रीजमधील बहुतांश साहित्य आगीत सापडले. त्यामुळे लाखो रुपयांचे साहित्य आगीत भस्मसात झाले. या आगीची माहिती इंडस्ट्रीच्या संचालकांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला ही माहिती दिली. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चार बंब पाण्याद्वारे ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पहाटे लागलेली आग ९ ते १० वाजेपर्यंत विझविण्यात आली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असून, घटनास्थळावर एमआयडीसी पोलीस तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती.