अकोला: अशोक वाटिका प्रेरणाभूमि ट्रस्ट तथा महिला महासंघाच्यावतीने शहरातील अशोक वाटिका परिसरात ‘बहूजनांची आई रमाई जन्मोत्सव सोहळा दि. ७ फेब्रुवारी रोजी थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाभरातील पाच हजार लेकींकडून माता रमाईंना मानवंदना देण्यात आली.
महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. वंचित बहुजन आघडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी नांदेड येथील ॲड. गोविंद दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती, तर भिक्खू सुनीत बोधी, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा संगिता अढाऊ, अरुंधती सिरसाट, प्रभाताई सिरसाट, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाअध्यक्ष पी. जे. वानखडे, भाऊसाहेब थोरात, गजानन गवई, जि. प. सदस्य शंकरराव इंगळे, मनोहर बनसोड, पराग गवई,देवानंद पाटील, अनिल पंडीत, कवी देवेंद्र शामस्कर, गजानन सुरवाडे आदी उपस्थित होते. अशोक वाटिका परिसरात जिल्हाभरातून आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावत माता रमाईंना अभिवादन केले. कार्यक्रमात चिमुकल्यांसह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरुषोत्तम वानखडे, संतोष रायबोले यांनी केले. प्रास्ताविक सुनील गवई, डॉ. ज्ञा. वा. गवई यांनी, तर आभार संगिता रायबोले यांनी मानले. भीम गितांतून केले प्रबोधनअशोक वाटिका परिसरात आयोजित बहुजनांची आई रमाई जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सपनाताई खरात व त्यांच्या संचाकडून भीम गितांचा कार्यक्रम संपन्न झाला. या भीम गितांमधून प्रबोधन करण्यात आले. परिसरात अनेक पुस्तकांचे स्टॉल व विविध साहित्यांचे स्टॉल लागले होते. दिवसभर जिल्हाभरातून आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावल्याने अशोक वाटिका परिसर गर्दीने फूलून गेल्याचे पहावयास मिळाले.