- राजेश शेगोकारअकोला: ‘सीएए’, ‘एनआरसी’ला विरोध करण्यासाठी जंतर-मंतरवर आयोजित धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रथमच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बहन मायावती यांना जाहीरपत्र दिले होते; मात्र मायावतींनी अॅड. बाळासाहेबांच्या पत्राला प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. राष्टÑीय पातळीवर राजकारण करण्यासाठी अॅड. आंबेडकरांनी प्रसंगी कम्युनिस्ट नेत्यांची साथ घेतली आहे; मात्र बहुजन नेत्यांना टाळी देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. या आंदोलनाच्या निमित्ताने मायावतींच्या माध्यमातून बहुजन नेत्यांना टाळी देण्याचा प्रयत्न मानला जात होता.सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाला राष्ट्रीय पातळीवर वलय आहे. त्यांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वेगळा प्रयोग केला. भारिप-बहुजन महासंघ या माध्यमातून त्यांनी राजकारणात सोशल इंजिनिअरिंग राबवून त्यांच्या पक्षाला यश मिळवून दिले. गत लोकसभा निवडणुकीत याच भारिप-बमसंचा विस्तार करीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून धनगर, ओबीसींसह मुस्लीम अशी मोट बांधली. या प्रयोगामुळे वैयक्तिकरीत्या अॅड. आंबेडकर विजयी होऊ शकले नसले तरी त्यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांची समीकरणे बिघडविली. हे सर्व प्रयोग राबविताना अॅड. आंबेडकरांनी राष्टÑीय पातळीवर एखाद्या बहुजन नेत्याला सोबत घेण्याची भूमिका यापूर्वी जाहीरपणे घेतल्याचे दिसत नाही. सीएए-एनआरसीला विरोध करण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना जंतर-मंतरवर आमंत्रित केले होते. मायावतींचे उत्तर प्रदेशातील महत्त्व व त्यांचे कार्य याची प्रशंसा करून अॅड. आंबेडकरांनी त्यांना लिहिलेले पत्र पाहता मायावती यांनी अॅड.आंबेडकरांना टाळी दिली, तर नव्या राजकीय समीकरणांची मांडणी होऊ शकेल, अशी राजकीय क्षेत्रात चर्चा होती. मंगळवारी झालेल्या धरणे आंदोलनात मायावती सहभागी झाल्या नाहीत; मात्र पुढच्या टप्प्यात त्या सहभागी झाल्या, तर भविष्यात हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘सीएए’, ‘एनआरसी’च्या माध्यमातून बहुजनांचे अधिकारच संपविण्याची तयारी हे सरकार करीत आहे. त्यामुळे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी बहन मायावतींना पत्र लिहून आमंत्रित केले होते. त्या आजच्या आंदोलनात सहभागी झाल्या नाहीत. कदाचित भविष्यात होतील. आंदोलन तीव्र करीत बहुजनांची ताकद वाढविणे, हाच आमचा प्रयत्न आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. आधी देश महत्वाचा.
- राजेंद्र पातोडे, राज्य प्रवक्ते वंचित बहूजन आघाडी