अकोट : नगरपालिकेच्या अंतर्गत होत असलेल्या रमाई घरकुल आवास/प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थींना तत्काळ निधी द्यावा तसेच अकोला नाका- कालंका चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी करीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी नगरपालिकेत धडक दिली होती. यावेळी नगरपालिकेत नगराध्यक्ष गैरहजर असल्याने कार्यकर्त्यांनी खुर्चीला निवेदन चिटकवून निषेध व्यक्त केला.
अकोट शहरातील मुख्य रस्ता असलेला अकोला नाका-कालंका चौकापर्यंतचा रस्ता पालिकेच्या दुर्लक्षतेमुळे गत वर्षभरापासून अपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम पूर्ण करावे व घरकुल लाभार्थींना त्वरित निधीचे वाटप करावे या मागणीसाठी ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी पालिकेत धडक दिली. यावेळी नगराध्यक्ष गैरहजर असल्याने खुर्चीला निवेदन चिटकविण्यात आले. यावेळी पालिकेत दररोज नागरिक तक्रारी घेऊन येत असतात; परंतु समस्या ऐकण्यासाठी नगराध्यक्ष जर हजर राहत नसतील, तर गाऱ्हाणी मांडायची कुठे, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. पालिकेअंतर्गत होत असलेले बांधकाम त्वरित पूर्ण करून येथील स्थानिक नागरिकांच्या समस्या निकाली काढाव्या, अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदनावर शहर उपाध्यक्ष अक्षय तेलगोटे, अजिंक्य वाळसे, विवेक सरदार, मंगेश तेलगोटे, आकाश तेलगोटे, किरण तेलगोटे, तेजस वानखडे, सुजल शर्मा, श्याम सपकाळ, जय तेलगोटे, शिवा शिवरकार, रोहन अंभोरे, दीपक अंभोरे, निखिल अंभोरे, ओम शिवरकार, उमेश तेलगोटे, यश तेलगोटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (फोटो)