- अतुल जयस्वालअकोला : नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे १६ ते २२ सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या ‘पल्स- २०१८’ या वार्षिक सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा महोत्सवात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या १०० वर विद्यार्थ्यांनी अधिष्ठातांच्या परवानगीविना हजेरी लावली. एवढेच नव्हे, तर सात दिवसांच्या या महोत्सवासाठी गेलेले हे विद्यार्थी चक्क आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाविद्यालयात परतले. दरम्यानच्या काळात त्यांनी तिकडे पर्यटनाचा आनंद लुटल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या बेशिस्त वर्तनासाठी अधिष्ठाता राजेश कार्यकर्ते यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्र पाठवून वस्तुस्थितीबाबत अवगत केले आहे.‘एम्स’ येथे विद्यार्थ्यांच्या संघटनेकडून दरवर्षी ‘पल्स’ या वार्षिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. यासाठी देशभरातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना निमंत्रण पाठविल्या जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यातील शेकडो एमबीबीएस द्वितीय वर्षाचे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दिल्ली येथे गेले होते. यामध्ये अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. यासाठी विद्यार्थ्यांनी अधिष्ठातांची रीतसर परवानगी घेतली नाही. वास्तविक पाहता हा कार्यक्रम १६ ते २२ सप्टेंबर या कालावधीत होता. कार्यक्रम पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी दुसºया किंवा तिसºया दिवशी महाविद्यालयात परतणे अपेक्षित होते; परंतु हे विद्यार्थी थेट आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात महाविद्यालयात आले. दरम्यानच्या काळात ‘एमबीबीएस’ द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा वर्गच भरला नाही. त्यामुळे जे विद्यार्थी गेले नव्हते, त्यांचेही शैक्षणिक नुकसान झाले.अधिष्ठातांनी पाठविले पालकांना पत्र!‘मास बंकिंग’च्या या प्रकाराची गंभीर दखल घेत जीएमसी प्रशासनाने एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या तब्बल १३५ विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्र पाठवून महाविद्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याची माहिती आहे.
‘एम्स’च्या कार्यक्रमाला दरवर्षी विद्यार्थी परवानगी न घेता जातात. आम्ही त्यांना परवानगी देत नाही. यासंदर्भात आम्ही ‘एम्स’च्या संचालकांनाही पत्र लिहून या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहू न देण्याची विनंती केली होती. यानंतरही हा प्रकार सुरूच आहे. ‘मास बंकिंग’ करणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांना आम्ही पत्र पाठविले आहे.- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.