अकोला : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या चमूने सोमवारी मूल्यांकनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली; परंतु यावेळी एमबीबीएस व निवासी डॉक्टरांची काही प्रमाणात अनुपस्थिती असल्याने एमसीआयच्या पथकाने नाराजी व्यक्त केली. असे असले, तरी नव्या वर्षात अकोला जीएमसीला एमबीबीएसच्या १५० जागांना मान्यता मिळणार असल्याचे निश्चित आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एमबीबीएसच्या १५० जागांच्या मूल्यांकनासाठी एमसीआयच्या चमूने सोमवारी जीएमसीला भेट दिली. एमसीआयच्या निरीक्षण पथकामध्ये गुजरात येथील डॉ. भट आणि डॉ. जैन आणि हरियाणा येथील डॉ. नागर होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाहणीदरम्यान एमसीआयच्या पथकाला १० ते १५ एमबीबीएस आणि निवासी डॉक्टर अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली; परंतु विविध कारणांमुळे डॉक्टर सुट्टीवर असल्याने अनुपस्थिती असल्याचे त्यांनी एमसीआयच्या पथकाला सांगितले. शिवाय काही पद मंजूर नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘एमसीआय’च्या पथकाची ही दुसरी भेट असून, यापूर्वी आॅगस्ट महिन्यात पथकाने भेट दिली होती. त्यावेळी एमबीबीएसची १६ टक्के, तर निवासी डॉक्टरांची १५ टक्के कमी दिसून आली होती; मात्र दुसºया भेटीदरम्यान त्यात काही प्रमाणात सुधारणा झाली असून, एमबीबीएसची १४ टक्के व निवासी डॉक्टरांची ११ टक्क्यांनी कमी दिसून आली. यावेळी पथकाने महाविद्यालय प्रशासनाला एमबीबीएसच्या १५० जागांसाठी अहवाल पाठविण्याचे आवाहन केले असून, जानेवारी २०२० मध्ये एमसीआयकडून एमबीबीएसच्या १५० जागांना मान्यता दिली जाणार आहे.वाढीव ५० जागांसाठी स्वतंत्र अहवालमेडिकल कॉन्सिल आॅफ इंडियाच्या पथकाने पाहणी केल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एमबीबीएसच्या १५० जागांना मान्यता मिळणार आहे; परंतु यंदा महाविद्यालयाची प्रवेश क्षमता २०० झाली आहे. त्यामुळे उर्वरित ५० जागांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एमसीआयकडे स्वतंत्र अहवाल पाठवावा लागणार आहे. हा अहवाल पाठविल्यानंतर एमसीआयचे पथक वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाहणीसाठी पुन्हा भेट देणार आहे.
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या पथकाने सोमवारी महाविद्यालयाची पाहणी केली. पथकाच्या सूचनेनुसार एमबीबीएसच्या १५० जागांच्या मंजुरीसाठी एमसीआयकडे अहवाल पाठविण्यात येणार असून, जानेवारीमध्ये त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे,अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला