मुंडगाव येथे गुटखा विक्रेत्याविरुद्ध कारवाई
मुंडगाव : दहशतवादविरोधी पथकाने रविवारी मुंडगाव येथे छापा घालून गुटखा विक्री करणारा निलेश माणिकराव म्हैसने, शिवराव डिक्कर(लोहारी) यांच्याकडून गुटखा जप्त करून अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दहीहांडा येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
दहीहांडा : वसीम काझी मित्रपरिवाराच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जि.प. सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, कृषी सभापती पंजाबराव वडाळ यांनी सोमवारी स्पर्धेचे उद्घाटन केले. कार्यक्रमाला प्यारेलाल जयस्वाल, अजिम, सुनील पोटे, दिलीप जामनेकर, प्रा. विजय आठवले, गोविंद गोयनका, दिनकर अस्वार आदी उपस्थित होते.
मिर्झापूर येथे महिला राजसत्ता आंदोलनाची शाखा
चिखलगाव : येथून जवळ असलेल्या मिर्झापूर येथे महिला राजसत्ता आंदोलनाच्या गाव शाखेचे वंचितच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट यांनी सोमवारी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी सरपंच चित्रा वानखडे होत्या. यावेळी शाखेच्या अध्यक्षपदी कविता वानखडे, उपाध्यक्ष जया वानखडे, गंगा वानखडे, नेहा वानखडे, सुजाता गवई यांची निवड करण्यात आली.
शेत रस्त्याची दुरवस्था, दुरुस्तीची मागणी
कुरूम/माना: कुरूम परिसरातील शेत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, शेतकऱ्यांना शेतातून माल आणण्यासाठी कसरत करावी लागते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर शेतकऱ्यांना शेतातून माल आणताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शेत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांनी केली आहे.
चोहोट्टा-दापुरा फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था
चोहोट्टा बाजार : चोहोट्टा बाजार-दापुरा फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
महावितरणची वसुली थांबविण्याची मागणी
आलेगाव : महावितरण कंपनीकडून आलेगावात दाखल होऊन सक्तीने वीजबिलांची वसुली करीत आहेत. बिल भरले नाही तर वीज खंडित करण्याची धमकी देण्यात येत आहे. शासन वीजबिल माफ करेल, या आशेने अनेकांनी बिलांचा भरणा केला नाही. महावितरणची वसुली थांबविण्याची मागणी होत आहे.
बोरगाव मंजू येथे कोरोना नियमांकडे र्दुलक्ष
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू गावामध्ये सुरुवातीला अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती. परंतु नंतर स्थिती पूर्वपदावर आली. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक बेफिकीर झाले आहेत. बाजारात बिनधास्त वावरताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तेल्हारा-कोठा रस्त्याची दैन्यावस्था
तेल्हारा : तेल्हारा-कोठा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे डांबरीकरण आले होते. परंतु सद्य:स्थितीत रस्ता पूर्णत: उखडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गुरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर
चान्नी : येथून जवळ असलेल्या चतारी येथे ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेच्या हौदात पाणी नसल्यामुळे गुरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात पाणी नसल्यामुळे गुरांना शेतातील पाण तलावांवर न्यावे लागत आहे.
भंडारज खुर्द येथे विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप
शिर्ला: शाळा बंद, शिक्षण चालू उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारज खु. येथे विद्यार्थ्यांना सोमवारी स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी विषय साधन व्यक्ती कटरे, चिकटे, संतोष राठोड, चव्हाण, मुख्याध्यापक अनिल पातुर्डे, प्रियंका ढाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राष्ट्रपाल तिडके उपस्थित होते.
पेव्हर ब्लॉकच्या कामास सुरुवात
हिवरखेड: मेनरोडवरील बसस्थानकापासून पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम प्रलंबित होते. रस्त्यालगतच पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने, नागरिकांनी समाधान व्यक्त केले.