अकाेला : जीवघेण्या काेराेनाला अटकाव घालण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ अशा परिस्थितीत हातावर पाेट असणाऱ्या कुटुंबांची परवड हाेत असून अनेकांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे़ ही बाब ध्यानात घेता राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या जिल्हाध्यक्ष श्रुती काटाेलकर व संघाच्या वतीने गरजू नागरिकांना जेवणाचे वाटप करण्यात आले़
शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनेकांचे लहान-माेठे व्यवसाय पूर्णत: विस्कळीत झाले आहेत़ उद्याेग, व्यवसाय व इतर कामे बंद पडल्यामुळे मजुरी करून कुटुंबाची गुजरान करणाऱ्यांची उपासमार हाेत आहे़ गरीब नागरिकांवर ओढवलेले संकट लक्षात घेता राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या वतीने मदतीचे हात सरसावले आहेत़ संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रुती काटाेलकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरासह इतर भागातील गरजू नागरिकांना जेवणाची पाकिटे वितरित करण्यात आली़ गतवर्षीही काेराेनाच्या संकटात मानवाधिकार सुरक्षा संघाच्या वतीने शहरातील गरजू नागरिकांना जेवण व इतर साहित्याची मदत देण्यात आली हाेती़