अकोट: हगनदारीमुक्त गाव करण्याकरिता शासनाकडून विविध अभियान, योजना राबविल्या जात आहेत; मात्र तरीसुद्धा अनेक गावे अद्यापही गोदरीमुक्त झाली नाहीत. त्यामुळे आता अकोट तालुक्यातील काही गावांतील गोदरीमध्येच चक्क सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे उघड्यावर शौचास जाणाºयांना पायबंद बसत असल्याची माहिती गटविकास अधिकारी बाबाराव पाचपाटील यांनी दिली.शासन स्तरावर स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र, गोदरीमुक्त गाव अभियान राबविले जात आहे. शिवाय घरोघरी शौचालये बांधण्याकरिता शासनाकडून लाभार्थींना निधी दिल्या जात आहे. तरीसुद्धा बहुतांश गावांमध्ये उघड्यावर शौचास जाणाºयांची संख्या कमी नाही. यावर उपाय म्हणून अकोला जिल्ह्यात पुन्हा गुडमॉर्निंग पथक सक्रिय करण्यात आले आहे. विशेष उघड्यावर शौचास बसणाºयांचा बंदोबस्त म्हणून अकोट तालुक्यातील पळसोद, टाकळी या गावातील गोदरीमध्ये चक्क सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे उघड्यावर शौचास बसणाºयांचे प्रमाण खूप कमी झाले. गावकरी शौचालयाचा नियमित वापर करतात. यामुळे उघड्यावर शौचास बसणाºया व्यक्तीचे सीसी कॅमेºयामध्ये चित्र दिसल्यानंतर त्यांच्याकडून ग्रामपंचायतच्या वतीने दंड वसूल करण्यात येते. तसेच यावेळी ग्रामपंचायत पळसोद, टाकळी येथे उघड्यावर शौचास जाणाºया व्यक्तीचे समुपदेशन करण्यात आले. गावातून गुड मॉर्निंग पथकाने फेरी काढण्यात आली. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी बाबाराव पाचपाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पावस्व यांच्या मार्गदर्शनात समाजशास्त्रज्ञ शाहू भगत, आयईसी सल्लागार राजेश डहाके, एमआयएस सल्लागार राहुल गोडले, अभियांत्रिकी तज्ज्ञ रोशन डामरे, गट समन्वयक संतोष चतरकर, कॅमेरामन कमलपुत्र सिरसाट, गावचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यापुढे कोणीही उघड्यावर शौचास बसू नये अन्यथा गुड मॉर्निंग पथकाने पकडल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम ११५ व ११७ नुसार १२०० रुपयांपर्यंत दंड अथवा ६ महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो. यावेळी संपूर्ण गुड मॉर्निंग पथकाचे चित्रीकरण करण्यात आले. जिल्ह्यात केव्हाही कोणत्याही गावात जिल्हा पथक धडकणार असल्याचे गटविकास अधिकारी पाचपाटील यांनी कळविले.