लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गोरक्षण रस्त्यावरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मंगळवारी या मार्गावरील मालमत्तांचे मोजमाप केले. नगररचना विभागाच्या कार्यवाहीमुळे स्थानिक रहिवाशांसह व्यावसायिकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांची चाळण झाल्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. थातूर-मातूर रस्ते दुरुस्ती केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच खड्ड्यांची समस्या कायम राहत होती. केंद्रासह राज्य व महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपाची सत्ता येताच भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्ते दुरुस्तीला प्राधान्य दिले. प्रमुख रस्ते टिकाऊ आणि दर्जेदार व्हावेत यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांच्या निधीतून नेहरू पार्क चौक ते तुकाराम चौकपर्यंत सिमेंट रस्ता प्रस्तावित करण्यात आला. रस्ते दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होत आहेत.संपूर्ण रस्ता १५ मीटर रुंदीचा होत असताना गोरक्षण रोडवरील महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंत हा रस्ता अवघा ११ मीटर रुंद केला जात आहे. इन्कम टॅक्स चौकातील इमारतींमुळे रस्ता रुंदीकरणाला अडथळा निर्माण झाला असून, या ठिकाणी ‘बॉटल नेक’ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित इमारतींना हटविण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले असून, मंगळवारी नगररचना विभागाच्यावतीने इन्कम टॅक्स चौकातील मालमत्तांचे मोजमाप घेण्यात आले.गावठाणच्या नावाखाली उभारल्या इमारती!सद्यस्थितीत शहराचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार झाला असला तरी जुने शहर म्हणून ओळखल्या जाणाºया जयहिंद चौक, काळा मारोती रोड, अगरवेस, पोळा चौक, शिवाजी नगर, खिडकी पुरा, नवाब पुरा आदी भागाची गावठाण म्हणून शासन दप्तरी नोंद आहे. गावठाणच्या जमिनीवर इमारत उभारण्यासाठी अतिरिक्त चटई निर्देशांक (एफएसआय) मंजूर होतो.ही बाब लक्षात घेऊन गोरक्षण रोडवर काही मालमत्ताधारकांनी त्यांच्या जमिनीचा गावठाणशी तसूभरही संबंध नसताना कागदोपत्री गावठाण असल्याचे दाखवत टोलेजंग इमारती उभारल्या. तत्कालीन नगर परिषदेच्या कार्यकाळात संबंधित इमारतींचे नकाशे मंजूर करण्यात आले. ही महापालिकेची तसेच शासनाची दिशाभूल व फसवणूक असल्याची बाब उजेडात आली आहे. याप्रकरणी प्रशासन फौजदारी कारवाई करण्याची दाट शक्यता आहे.रस्ता खोदला; नागरिकांच्या जीविताला धोका!गोरक्षण रोडवरील ‘बॉटल नेक’ दूर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनपाच्या कारवाईपूर्वीच ‘पीडब्ल्यूडी’ने अरुंद रस्ता तयार करण्यास सुरुवात केली होती. महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौकापर्यंत रस्त्याचे खोदकाम झाल्यानंतर सदर काम बंद करण्यात आले. खोदलेल्या रस्त्यात पावसाचे पाणी साचले असून, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी तातडीने मुरूम टाकण्याची गरज आहे.
गोरक्षण मार्गावरील मालमत्तांचे केले मोजमाप!
By ram.deshpande | Published: July 26, 2017 2:39 AM