शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील एस.आर. एल. आय.सी.टी.सी. प्रयोग शाळेत विविध नमुन्यांची तपासणी केली जाते. प्रयोगशाळेच्या गुणवत्तापूर्ण कार्याची पाहणी करून नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लेबॉरटरीजने (एन.ए.बी.एल.) सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे प्रमाणपत्र दिले. एन.ए.बी.एल.च्या चमूने काही दिवसांपूर्वीच अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रयोगशाळेला भेट देऊन निरीक्षण केले होते. या निरीक्षणामध्ये तपासण्यात येणाऱ्या अहवालाची गुणवत्ता, जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन व इतरही बाबींची पाहणी करण्यात आली. त्यांनी सकारात्मक अहवाल बोर्डाकडे सादर केला. एन.ए.बी.एल. ही राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळांची गुणवत्ता तपासणी करणारी संस्था आहे. त्यामुळे हा बहुमान अकोला जीएमसीच्या प्रयोगशाळेला मिळणे गर्वाची बाब आहे. सूक्ष्मजीवशात्र विभागप्रमुख डॉ. नितीन अंभोरे यांच्या मार्गदर्शनात प्रयोगशाळेचे कामकाज चालते. त्यांना सहयोगी प्राध्यापक डॉ. रूपाली मंत्री, डॉ. अभिषेक गोयंका, डॉ. पूजाश्री शर्मा, तांत्रिक अधिकारी जगदीश मोरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस.एम. काझी, भारती तिवारी, सुमेरा खान, समुपदेशक सविता बोरकर आणि एन.पी. रंगळे तसेच दर्शन जनईकर व त्यांच्या चमूने सहकार्य केले. त्यांच्या या कार्याचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी जगभिये यांनी कौतुक केले.
मेडिकल प्रयोग शाळेला आय.एस.ओ. मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:19 AM