संसर्गजन्य काेराेना विषाणूच्या लाटेत उद्याेग,व्यवसाय काेलमडून गेले. काेराेनाची बाधा झाल्याने कुटुंबातील ज्येष्ठ महिला,पुरूषांचा मृत्यू झाल्याने अनेक परिवारांची हानी झाली. शहरात काेराेनाचा फैलाव वाढला असताना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जबाबदारीच्या भावनेतून महापालिकेचे झाडून सर्व अधिकारी,कर्मचारी व शिक्षक कामाला लागले हाेते. एप्रिल २०२० पासून ते आजपर्यंत मनपातील क्षेत्रीय अधिकारी, आराेग्य निरीक्षक, सहाय्यक कर अधीक्षक, वसूली निरीक्षक, शिक्षक तसेच आशा वर्कर सतत काेराेनाच्या कामाला लागल्याचे चित्र आहे. या वर्षभराच्या कालावधीत मनपाच्या प्रशासकीय कामकाजात अनेक बदल हाेउन सुधारणा झाल्या. वैद्यकीय आराेग्य यंत्रणा सतत सक्रीय असल्याचे पहावयास मिळत आहे. काेराेना बाधीत रुग्णांची यादी तयार करणे, त्यांना संपर्क साधणे, रुग्णालयात उपचार घेत आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करून घरी कुटुंबातील सदस्यांची विचारपूस करणे आदी अनेक जबाबदाऱ्या या विभागाकडून पार पाडल्या जात आहेत. काेराेनाचे संकट उद्भवल्यामुळेच वैद्यकीय यंत्रणेत त्रुटी असल्याची जाणीवही प्रशासनाला झाली. या विभागात तांत्रिक मनुष्यबळाचा अभाव असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर हाेत असल्याची बाब प्रकर्षाने समाेर आली.
उत्पन्नाकडे दुर्लक्ष
मनपाच्या उत्पन्नाचा सर्वात माेठा स्त्राेत मालमत्ता कर आहे. मागील वर्षभरापासून काेराेनामुळे नागरिकांचे व्यवसाय प्रभावित झाले असून त्याचा परिणाम कामगार वर्गावर झाला आहे. त्यात भरीस भर टॅक्स दरवाढीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने कराची थकीत रक्कम जमा करण्यासाठी नागरिकांनी आखडता हात घेतला आहे. एकूणच परिस्थिती पाहता काेराेना काळात प्रशासनाचे उत्पन्नाकडे दुर्लक्ष झाले आहे.