जखमी माकडाला जीवनदान
मूर्तिजापूर: झाडावरून खाली पडून जखमी झालेल्या गर्भवती मादी माकडाला नागरिकांनी पशुवैद्यकीय उपचार देऊन जीवनदान दिले. नगरसेविका स्नेहा नाकट यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावरकर यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळावर पोहोचवून माकडाचे प्राण वाचविले.
हिवरखेड येथे स्वच्छतागृहाची मागणी
हिवरखेड: ४० हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या हिवरखेड येथे एकही शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होते. ग्राम पंचायत प्रशासनाने गावासह बसस्थानक परिसरात सार्वजनिक शौचालय उभारावे. अशी मागणी हिवरखेड येथील नागरिकांनी ग्राम पंचायत प्रशासनाकडे केली आहे.
निमकर्दा येथील जुगारावर छापा
उरळ: निमकर्दा येथे सुरू असलेल्या जुगारावर शुक्रवारी पोलिसांनी छापा घालून राजेश प्रल्हाद इंगळे, अनिल सुखदेव इंगळे, गणेश किसन इंगळे, ओंकार कळसाईत, जबीरखा नासीर खा, कैलास जाधव यांना अटक केली. त्यांच्याकडून १९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
खंडाळा येथील युवक बेपत्ता
खंडाळा: तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथील विजय अवचार यांचा २७ वर्षीय मुलगा वैभव अवचार हा ३ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी नोंद केली आहे. वैभव हा आजारी असून, बुधवारी पहाटेपासून तो बेपत्ता झाला.
तुरीची गंजी जळाल्याने नुकसान
बाळापूर: येथील शेतकरी लक्ष्मण जोहरीकर यांच्या सातरगाव शिवारातील शेतात सोंगून ठेवलेल्या तुरीच्या गंजीला बुधवारी अचानक आग लागली. यात त्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी त्यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय आहे.
बोरगाव वैराळे गावात पाणीटंचाई
बोरगाव वैराळे: गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेलला पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहेत. गावातील पाणी समस्येकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.
पिंजर परिसरात अवैध धंद्यांचा बंदाेबस्त करा
पिंजर: पिंजर परिसरात जुगार, अवैध दारू विक्री सुरू आहे. या अवैध धंद्यावर पोलिसांनी कारवाई करावी. अशी मागणी परिसरातील नागरीकांनी ठाणेदार पडघान यांच्याकडे केली आहे. गत काही दिवसांपासून परिसरात अवैध धंदे फोफावले असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सायवणी येथे भागवत सप्ताह
बार्शीटाकळी: सायवणी येथे जागृत हिरोबा महाराज संस्थेच्या यात्रा महोत्सवानिमित्त १२ ते १९ फेब्रुवारीदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व संगीत भागवत होणार आहे. भागवताचार्य हभप शिवाजी महाराज ढाकरे यांच्या वाणीतून भागवत होणार आहे. अशी माहिती हभप केशवराव महाराज ताले यांनी दिली.