-------------------------------
अवकाळी पावसाची हजेरी
तेल्हारा : शहरात मंगळवारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. ढगाळ वातारणामुळे दिवसभर गारवा पसरला होता.
----------------------
वीजपुरवठा खंडित; नागरिक त्रस्त !
तेल्हारा : शहरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्याने रात्र अंधारात काढवी लागली. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला.
--------------------
रेतीची अवैध वाहतूक; ट्रॅक्टर जप्त
तेल्हारा : रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच ३० एझेड ९८८३) १ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पकडण्यात आला. या कारवाईत १ ब्रॉस रेती जप्त करण्यात आली. ही कारवाई तेल्हाऱ्याचे प्रभारी तहसीलदार राजेश गुरव यांनी केली.
--------------------------------
दहीहांडा परिसरात अवकाळी पावसाच्या सरी
दहीहांडा : परिसरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, सोमवारच्या रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. मंगळवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.
----------------------------------
चिखलगाव परिसरात हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव
चिखलगाव: गतवर्षीच्या तुलनेत यंदा परिसरात हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र वाढले आहे. गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळींच्या नियंत्रणासाठी शेतकरी फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.
-----------------------------
खंडाळा येथे विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगणाची निर्मिती
खंडाळा : येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळेला संतोष गाडोदिया यांनी दान दिलेल्या जागेवर विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगणाची निर्मिती करण्यात येत आहे. या जागेला तारेचे कुंपण करण्यात आले असून, लवकरच विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण सज्ज होणार आहे.
-----------------------------
करडईचे पेरणी क्षेत्र घटले !
बोरगाव मंजू : परिसरातील खरप बु., घुसर, म्हातोडी आदी शेतशिवारामध्ये करडईची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती; मात्र गत दोन ते तीन वर्षांपासून शेतकऱ्यांनी करडईला नापसंती दर्शविल्याने यंदा करडईचे पेरणी क्षेत्र घटले आहे.
------------------------
बाळापूर शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य
बाळापूर : शहरात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे न.प.ने लक्ष देऊन स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होत आहे.
--------------------------------------
अकोट पालिकेची रस्ते प्रकल्पातील कामे प्रगतिपथावर !
अकोट : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून नगर परिषदेने शहरातील प्रस्तावित केलेले १५ डिपी रस्ते व एका पुलाचे काम मंजूर आहे. त्यापैकी काही कामे झाली आहेत, तर काही कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित रस्त्यांचे कामालाही सुरुवात होणार आहे.
--------------------
व्याळा-खिरपुरी रस्त्याची दुरवस्था !
बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तालुक्यातील व्याळा-खिरपूरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-----------------------------------