अकोला: जिल्हय़ातल्या खारपाणपट्टय़ातील ६४ गावांच्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणापासून खांबोराजवळील उन्नई बंधार्यापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या विषयावर पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी सोमवार, ८ मे रोजी मुंबई येथील मंत्रालयात संबंधित अधिकार्यांची बैठक बोलावली आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आणि मूर्तिजापूर शहराला महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून काटेपूर्णा नदीद्वारे खांबोराजवळील उन्नई बंधार्यापर्यंत पाणी सोडले जाते. नदीद्वारे पाणी सोडण्यात येत असल्याने, पाण्याचा प्रचंड अपव्यय होतो. त्यामुळे धरणातील पाण्याचा होणारा प्रचंड अपव्यय थांबविण्यासाठी खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याकरिता महान येथील काटेपूर्णा धरणापासून खांबोराजवळील उन्नई बंधार्यापर्यंत २३ किलोमीटर जलवाहिनी टाकून, खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावे आणि मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता २३ कोटी ७८ लाख रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव गतवर्षी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आला. या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुषंगाने महान येथील काटेपूर्णा धरणासून खांबोरा जवळील उन्नई बंधार्यापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या योजनेला शासनामार्फत प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे. त्यासाठी या विषयावर शासनाच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी ८ मे रोजी दुपारी ४ वाजता मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबंधित अधिकार्यांची बैठक बोलावली आहे. त्यानुसार या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, मूर्तिजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकार्यांचे प्रतिनिधी म्हणून मूर्तिजापूरचे तहसीलदार उपस्थित राहणार आहेत.
काटेपूर्णा धरण-खांबोरा जलवाहिनी टाकण्यासाठी प्रधान सचिवांनी बोलावली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2017 1:45 PM