अकोला : केंद्र सरकारने गत चार वर्षांच्या कालावधीत केलेल्या विविध कामांची माहिती देत, जिल्ह्यातील तूर व हरभरा खरेदीच्या मुद्द्यावर बुधवारी सहकारमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पृष्ठभूमिवर अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘नाफेड’मार्फत तूर खरेदी गत १५ मे पासून बंद करण्यात आली आहे; मात्र आॅनलाइन नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी अद्याप बाकी आहे, तसेच खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप शेतकºयांना मिळाले नाहीत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील तूर व हरभरा खरेदी, प्रलंबित चुकारे आणि तूर व हरभरा खरेदीसंदर्भात शेतकºयांच्या तक्रारी इत्यादी मुद्द्यांवर बुधवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था ) व संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, सरकारने केलेल्या कामांची माहिती २५ मे ११ जूनपर्यंत जनतेला देण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील पालकमंत्री चार वर्षात सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला देणार आहेत, तसेच लाभार्थी आणि बुद्धीजीवींचे संमेलने घेण्यात येणार आहे. लोकांच्या घरापर्यंत पोहोचून सरकारच्या कामांची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगत, गत चार वर्षात सरकारने केलेल्या कामांची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, सिंचनावर विशेष भर, शेतकºयांना मदतीसाठी ५० टक्के नुकसान भरपाईचा निकष ३५ टक्क्यांवर आणला असून, महिलांसाठी ३६ आठवड्यांची प्रसूती रजा यांसह शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य विकास अशा विविध योजना व कार्यक्रम राबवून, सरकारने परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार वसंतराव खोटरे, नारायणराव गव्हाणकर, डॉ.अशोक ओळंबे, हरीश आलीमचंदाणी, माजी महापौर उज्ज्वला देशमुख, अॅड. मोतीसिंह मोहता, मनोहर हरणे उपस्थित होते.
नेर-धामणा बॅरेजसह जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प लवकरच होतील पूर्ण!बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत नेर-धामणा बॅरेजसह जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करीत, नेर-धामणा बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सांगितले. नेर-धामणा बॅरेजच्या कामासाठी ३८ लाखांचा निधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.