पदाधिकारी-अधिकाऱ्यांची चर्चा निष्फळअकोला : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा पंधरा कोटी रुपये निधी अखर्चित राहत आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांच्या वागणुकीचा मुद्दा प्रतिष्ठेचा करीत सभापती पुंडलिक अरबट यांनी दिलेल्या पत्रावर तोडगा काढून निधी खर्च करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी बोलाविलेली बैठक वांझोटी ठरली. नागर यांच्या कामकाजाबाबतची भूमिका स्पष्ट न झाल्याने चर्चा पुढे सरकलीच नाही. मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांनी अर्थ समिती सभापती पुंडलिक अरबट यांना हवी असलेली माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रकार ३० मार्च रोजी घडला, तसेच तक्रार करण्याचे आव्हानही दिले. त्यामुळे ३१ मार्च रोजी रोकड, धनादेश नोंदवही, आवक-जावक वहीची मागणी केली. ती देण्यासही टाळाटाळ करण्यात आली. परिणामी, अरबट यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी पत्र देत नागर यांना ३१ मार्चनंतरची देयके अदा न करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे २०१६-१७ या आर्थिक वर्षातील कोट्यवधींचा निधी खर्चच थांबला. पदाधिकाऱ्यांची शिष्टाईही पाण्यात जिल्हा परिषदेच्या विकास योजनाच बुडणार, ते होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखॉ पठाण, सदस्य दामोदर जगताप, विजय लव्हाळे, चंद्रशेखर पांडे गुरुजी, प्रतिभा अवचार यांच्यासह बैठक बोलावण्यात आली. त्यामध्ये अर्थ सभापती पुंडलिक अरबट, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांनाही बोलावण्यात आले. नागर यांचे घूमजावयावेळी अरबट यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यावर नागर यांच्याशी सदस्यांनी चर्चा केली; मात्र त्यांनी काहीही न बोलता लेखी देण्याचा पवित्रा घेतला. त्याशिवाय, घटनाक्रमात सांगितल्याप्रमाणे काही बोललेच नाही, असा पवित्राही त्यांनी घेतला. त्यामुळे आणखी संतप्त झालेले सभापती अरबट यांनी आपण खोटे बोलत असल्यास राजीनामा देण्याचीही तयारी दाखविली. नागर यांची भूमिका स्पष्ट न झाल्याने निधी खर्चाचा मुद्दा अनिर्णित राहिला.
निधी वाचविण्याची बैठक ठरली वांझोटी
By admin | Published: April 06, 2017 1:38 AM