अकोला : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी पूर्वतयारीच्या मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी घेण्यात आली. या बैठकीत मंगळवारपासून सर्कलनिहाय पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले.
पोटनिवडणुका होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सर्कलमधील सामाजिक आणि राजकीय समीकरणे तसेच पक्षाची तयारी यासंदर्भात आढावा घेत, पक्षाच्या जिल्हयातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी २९ जूनपासून सर्कलनिहाय दौरा करून, तेथील पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीला महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषद गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, बालमुकुंद भिरड, दामोदर जगताप, ॲड. संतोष रहाटे, अशोक शिरसाट, प्रा. सुरेश पाटकर, डाॅ. प्रसन्नजित गवई, सैफुल्लाभाई, सचिन शिराळे आदी उपस्थित होते.
....................................
वंचितच्या प्रदेश कार्यकारिणीत आज निर्णय
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. २८ जून रोजी पुणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अकोला जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर व महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
काॅंग्रेसची आज बैठक
निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी काॅंग्रेसचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सोमवार, दि. २८ जून रोजी अकोल्यातील स्वराज्य भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे माजी मंत्री, माजी आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे आजी, माजी सदस्य, जिल्हा काॅंग्रेसच्या युवक, महिला, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती व जमाती सेलचे पदाधिकारी, सेवादलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांची पूर्वतयारीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे, असे काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी सांगितले.