लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला-बडनेरा रेल्वे मार्गदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक करण्यात आल्यामुळे अप आणि डाउनकडे धावणार्या रेल्वेगाड्या उशिराने धावल्यात. दोन्ही मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने सुटल्याने प्रवाशांचे चांगलेचं हाल झालेत. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि नरखेड-भुसावळ पॅसेंजर या दोन्ही रेल्वेगाड्या अनेक तास उशिराने अकोल्यात पोहोचल्यात.कुरूम-माना रेल्वे मार्गावर ब्रिटीशकालीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामांचा भाग म्हणून शनिवारी मेगा ब्लॉक केला गेला. त्यामुळे शनिवारी सकाळी अकोल्यातून जाणार्या रेल्वे गाड्यांची गती मंदावली. नागपूरकडे जाणार्या रेल्वे गाड्यांची गती मेगा ब्लॉकदरम्यान कमी झाली. त्यात अनेक तासांचा कालावधी लागला.
दरम्यान, रविवारी पहाटे कुरूम रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर ओएचईचे मुख्य तार तुटल्याने नागपूर होत हावडाकडे जाणार्या रेल्वेगाड्या अकोला स्थानकावर आणि स्थानकाबाहेरचं थांबविल्या गेल्यात. त्यामुळे अकोल्यात येणारी अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा अर्धातास उशिराने पोहोचली. त्यानंतर ही गाडी नागपूरकडे उशिराने रवाना झाली. त्यानंतर मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस रवाना झाली. मात्र, पुन्हा ही गाडी मध्येच थांबविली गेली. सोबतच तिरुपती -अमरावती एक्स्प्रेसला देखील बोरगाव मंजू रेल्वेस्थानकाजवळ थांबविण्यात आले. कुरूम रेल्वे स्टेशनचे अधीक्षक जगदीश यादव यांनी तत्परता दाखवून बडनेराच्या ओएचईशी संपर्क साधून तुटलेल्या तार जोडणीसाठी बोलावून घेतले.
प्रवाशांचे हाल-बेहाल४अकोला रेल्वे स्थानकाहून सुटल्यानंतर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस आणि मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस आणि तिरूपती-अमरावती एक्स्प्रेसला मध्येच थांबविण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झालेत. पाणी आणि खाद्य पदार्थदेखील विकत घेता आले नाही.