बार्शीटाकळी नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदी मेहफुज खान रसुल खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 06:09 PM2018-07-20T18:09:33+5:302018-07-20T18:11:39+5:30
बार्शीटाकळी : बार्शीटाकळी नगर पंचायतच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने वर्चस्व मिळवित नगराध्यक्ष पदासह सहा नगरसेवक पदाच्या जागा जिंकल्या आहेत.
बार्शीटाकळी : बार्शीटाकळी नगर पंचायतच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने वर्चस्व मिळवित नगराध्यक्ष पदासह सहा नगरसेवक पदाच्या जागा जिंकल्या आहेत. बार्शीटाकळी नगर पंचायतचे पहिले नगराध्यक्ष म्हणून महेफुज खान रसुल खान हे विजयी झाले आहेत. १५ जुलै रोजी झालेल्या मतदानाचा २० जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात आला. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भारिप-बमसं यांनी प्रत्येकी सहा जागांवर विजय मिळविला आहे. भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळविला. नगराध्यक्ष पदासाठी पाच, तर नगरसेवक पदासाठी ६७ उमेदवार रिंगणात होते.
बार्शीटाकळी नगर पंचायतसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. या मतदानाचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या महेफुज खान रसुल खान यांनी भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार इमोद्दीन अलीमोद्दीन यांचा १ हजार ६२२ मतांनी पराभव केला. महेफुज खान यांना ४ हजार ९८६ तर नईमोद्दीन अलीमोद्दीन यांना ३ हजार ६६४ मते मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेल्या भाजपच्या संजय बाबुलाल इरचे यांना १ हजार ७२४, शिवसेनेचे गजानन यशवंतराव आखाडे यांना १ हजार १८३ मते आणि अपक्ष उमेदवार अलमगीर खान ७१३ मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि भारिप-बमसंचे बरोबरी साधली आहे. काँग्रेसचे सहा उमेदवार विविध वॉर्डातून विजयी झाले आहेत. तसेच भारिप-बसमंच्याही सहा उमेदवारांना विजय मिळाला आहे. भाजपाला दोन, तर अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळविला आहे. शिवसेनेला या निवडणुकीत भोपळही फोडता आला नाही. (तालुका प्रतिनिधी)
पक्षनिहाय जागा
काँग्रेस- ०६
भारिप-बमसं- ०६
भाजप- ०२
अपक्ष- ०३