- विजय शिंदेअकोट - मेळघाट प्रकल्पातील पुनर्वसीत गावातील समस्या घेऊन आकोट येथून पायदळ मोर्चाने 6 डिसेंबरला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गावकरी व आदिवासी बांधवांनी कूच केली. महाराष्ट्र असंघटीत कामगार काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली हा पायदळ मोर्चो निघाला आहे. हातात न्याय्य मागणीचे फलक घेऊन मोर्चामध्ये महिला पुरुष मुला-बाळांसह सहभागी झाले आहेत. मोर्चात आमदार आशिष देशमुख यांच्यासहीत अन्य दिग्गज मंडळीही सहभागी झाले आहेत.
आकोट तालुक्यात पुनर्वसीत झालेल्या गावांमध्ये शेतजमिनीसह मुलभूत सुविधा पूर्णत: मिळाल्या नाहीत. विशेष म्हणजे त्यांना कुठलेही रोजगाराचे साधन नाही. आरोग्य, शैक्षणिक, पिण्याचे पाणी, बेरोजगारी आदींसह विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी सोडविण्याकरिता आकोट वन्यजीव विभाग येथून हा पायदळ मोर्चा अकोल्याकडे निघाला. सायंकाळी दहीहांडा फाटा येथे मुक्काम करुन 7 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असून निवेदन सादर करण्यात येणार आहे.
या पदयात्रेला संबोधित करण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेता बाळासाहेब विखे पाटील यांची उपस्थिती राहणार आहेत. विशेष म्हणजे सर्वप्रथम लोकमतने मेळघाट प्रकल्पातील पुनर्वसीत गावातील समस्या व अडचणींना घेऊन व्यथा मांडल्यानंतर प्रशासन जागी झाले.