- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सर्व वन परिक्षेत्रांतर्गत अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राणी गणना करण्यात आली. यावर्षी मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांची नोंद झाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ४ हजार ९५३ प्राण्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. अकोला वन्यजीव विभागात ९८२ वन्य प्राणी यावर्षी आढळले. या वन्यजीवांच्या दर्शनामुळे प्रगणनेकरिता गेलेल्या वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.रात्रीच्या अंधारात जंगलातील नीरव शांततेत रात्र किड्यांचा किर्रर्र आवाज, पौर्णिमेच्या चंद्राचा लख्ख प्रकाश अशा रोमांचकारी वातावरणात वन्यजीवप्रेमींनी जंगलातील विविध वन्य प्राण्यांचा प्रत्यक्ष दर्शनाचा थरार १८ मे रोजी अनुभवला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत विविध अभयारण्यांमध्ये ४४६ मचान बांधण्यात आले होते. या मचानवर ४११ वन्यप्रेमींनी रात्रभर जागून वन्य प्राण्यांच्या हालचाली टिपल्या व त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा थरार अनुभवला. अनेक वन्य प्राणी हे किर्रर्र जंगलात तसेच पाणवठ्यांवर तसेच मुक्त संचार करताना आढळून आले.रविवारी सकाळी वन्यप्रेमींनी या वन्य प्राण्यांचे पगमार्क घेतले आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात या प्रगणनेत वाघांची संख्या ‘जैसे थे’च असल्याची नोंद झाली तर बिबट, अस्वल, जंगली कुत्रे, सांबर, विविध जातींचे हरीण, नीलगाय आदी प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.अकोला विभागात वाघ नाही!अकोला वन्यजीव विभाग काटेपूर्णा, ज्ञानगंगा, कारंजा सोहल या अभयारण्यात प्रगणना करण्यात आली. या प्रगणनेकरिता ४० मचान बांधण्यात आले होते. या चाळीस मचानांवर ५२ वन्यप्रेमींनी हजेरी लावत प्राण्यांच्या गणनेत सहभाग घेतला होता. या गणनेमध्ये गतवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात प्राण्यांची संख्या वाढली आहे. या प्रगणनेत गतवर्षी १० बिबट आढळले होते. यावर्षी मात्र दोनच बिबट आढळून आले आहेत. अस्वलांची संख्यासुद्धा कमी झाली असून, इतर प्राण्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. या प्रगणनेत नोंद करण्यात आलेल्यांमध्ये वाघ एकही नाही. बिबट २, अस्वल ११, गवा एकही नाही, रानडुक्कर ४८८, सांबर हरीण २५, चित्तल हरीण ५८, नीलगाय १९९, काळवीट १०८, सायाळ ६, तडस १, लंगुर ७९ इतके वन्यप्राणी आढळून आले आहेत. या वन्यप्रेमींकडून घेण्यात आलेल्या नोंदी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात व अकोला वन्य विभागात नोंदविण्यात आल्या आहेत.मेळघाटात ४,९५३ तर अकोला विभागात १,४७२ वन्य प्राणी४मेळघाट व्याघ्र प्रकल्पात १८ मे रोजी करण्यात आलेल्या प्रगणनेत एकूण ४ हजार ९५३ प्राण्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. गतवर्षी ३० एप्रिल २०१८ रोजी करण्यात आलेल्या प्रगणनेत केवळ १ हजार ४७२ प्राण्यांच्या नोंदी झाल्या होत्या. शिवाय, अकोला वन्यजीव विभागात ९८२ वन्य प्राणी यावर्षी आढळले. गतवर्षी १३९ वन्य प्राण्यांच्या नोंदी घेण्यात आल्या होत्या. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोला वन्यजीव विभागत गतवर्षीच्या तुलनेत प्राण्यांची संख्या चांगलीच वाढल्याने वन विभाग व वन्यप्रेमींना दिलासादायक चित्र आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळले १६ वाघ, २९ बिबट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:59 PM
अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सर्व वन परिक्षेत्रांतर्गत अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राणी गणना करण्यात आली.
ठळक मुद्दे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ४ हजार ९५३ प्राण्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.अकोला वन्यजीव विभागात ९८२ वन्य प्राणी यावर्षी आढळले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत विविध अभयारण्यांमध्ये ४४६ मचान बांधण्यात आले होते.