अकोला: जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या नवीन इमारतींची बामधकमे आणि शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांची यादी जिल्हा जिल्हा नियोजन समितीने मंजूर केली असून, त्यामध्ये शिक्षण समितीने मंजूर केलेली अनेक कामे नसल्याच्या मुद्द्यावर जिल्हा शिक्षण समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याने, बुधवारी जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा तहकूब करण्यात आली.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या नविन इमारतींची बांधकामे आणि शाळा दुरुस्ती कामांची यादी जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात आली असून, प्रशासकीय मंजुरीसाठी या कामांची यादी जिल्हा परिषदकडे पाठविण्यात आली आहे. नवीन शाळा बांधकाम व दुरुस्ती कामांच्या यादीमध्ये जिल्हा परिषद शिक्षण समितीने मंजुरी दिलेल्या अनेक कामांचा समावेश नसल्याच्या मुद्द्यावर शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याअनुषंगाने या विषयाची माहिती घेण्यासाठी शिक्षण समितीची सभा गुरुवार २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष तथा शिक्षण सभापती प्रतिभा भोजने यांनी घोषित केला. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण समितीची तहकूब सभा गुरुवारी घेण्यात येणार आहे.