अकोला : कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत ३ लाख ३१ हजार ६९७ लाभार्थींनी लस घेतली. यामध्ये ४६.६६ टक्के महिला, तर ५३.३४ टक्के पुरुषांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यांत लसीकरणात महिलांची संख्या जास्त असली, तरी अकोल्यात मात्र पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात दुसऱ्या डोसच्या लाभार्थींना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे ही मोहीम सध्यातरी संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३१ हजार ६९७ लोकांनी लस घेतली आहे. त्यापैकी २ लाख ५३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पहिला, तर सुमारे ७६ हजार लोकांनी दुसरा डाेस घेतला आहे. लसीकरणात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण ६.६८ टक्क्यांनी जास्त आहे. आतापर्यंत सुमारे १ लाख ७६ हजार ९२८ पुरुषांनी लस घेतली, तर १ लाख ५४ हजार ७६९ महिलांनी लस घेतली आहे. महिलांमध्ये लसीकरणाविषयी उदासीनता नसली, तरी लस घेतल्यानंतर येणारा ताप, अंगदुखी या कारणांमुळे अनेक महिला लस घेण्यास टाळत असल्याचे दिसून येते. याशिवाय, ऑनलाइन अपॉईंटमेंट मिळत नसल्यानेदेखील काही महिलांचे म्हणणे आहे.
वयोगटानुसार लसीकरण
वयोगट - पहिला डोस - दुसरा डोस
१८ ते ४५ - १७३०५ - ७८९४
४५ ते ६० - १०४७६४ - २५९३७
६० वरील - ८७४९३ - २७३९१
आतापर्यंत झालेले लसीकरण
पुरुष १,७६,९२८
महिला - १,५४,७६९
जिल्ह्यात एकूण लसीकरण
३,३१,६९७
मी लस नाही घेतली कारण
४५ वर्षांआतील लसीकरणास सुरुवात झाली होती, मात्र त्यावेळी ऑनलाइन अपॉईंटमेंट मिळाली नाही. त्यानंतर प्रयत्न केला, तर या गटासाठी लसीकरण बंद झाले. त्यामुळे आता २१ जूनची वाट बघणे सुरू आहे.
- वर्षा गेडाम, गृहिणी, अकोला
४५ वर्षांआतील लसीकरण बंद असल्याने लस मिळणे शक्य नाही. ज्यावेळी सुरू होते, त्यावेळी ऑनलाइन अपॉईंटमेंट मिळाली नाही. त्यामुळे लस घेतली नाही. ४५ वर्षांआतील वयोगटासाठी नव्याने मोहीम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे, मात्र त्यावेळी लसीकरणासाठी महिलांना अपॉईंटमेंट मिळावी यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी.
- धनश्री वंजारे, गृहिणी, अकोला