लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी शासनामार्फत कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमांतर्गत नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी प्रामुख्याने महिलांवरच भर दिला जात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात एकूण ३ हजार ३६६ जणांची नसबंदी करण्यात आली होती. त्यामध्ये पुरुषांचे प्रमाण केवळ १५२ होते, तर ३,२१४ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. २०१९-२० मध्येही पुरुषांमध्ये नसबंदीची भीती कायम दिसून आली. या वर्षात ३ हजार ६४० महिलांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली, तर केवळ १३३ पुरुषांनी मोहिमेंतर्गत शस्त्रक्रिया केली. २०२०-२१ मध्ये एकाही पुरुषाने कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली नाही. चालू वर्षात एक हजार ५६८ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे नसबंदी ही फक्ती स्त्रियांनीच करावी, असा अलिखित नियम झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये बदल होणे अपेक्षित असून, आरोग्य विभागामार्फत त्यात बदल होणे अपेक्षित आहे.
एक नजर... शस्त्रक्रियांवर
वर्ष - महिला - पुरुष
२०१८-१९ - ३,२१४ - १५२
२०१९-२०- ३,६४० - १३३
२०२०-२१ - १,५६८ - ००
काय आहेत गैरसमज
पुरुषप्रधान संस्कृती असल्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ही महिलांनीच करावी, असा गैरसमज पुरुषांमध्ये आहे. ही स्थिती आजची नाही, तर अनेक वर्षांपासून सुरू आहे. यासोबतच पुरुषांमध्ये शस्त्रक्रियेविषयी भीतीदेखील असते. त्यामुळेच महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शस्त्रक्रिया कमी असल्याचे चित्र दिसून येते.
कुटुंब नियोजन हे महिलांसोबतच पुरुषांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ महिलांनीच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी, हे चुकीचे आहे.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी