सचिन राऊत - अकोलाशहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या बहुतांश व्यापारी संकुलांचा तिसरा आणि चौथ्या माळा नशेखोरांचा अड्डा झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. टिळक रोडवरील त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर एका १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर ‘लोकमत’ने शहरातील व्यापारी संकुलांची पाहणी केली असता, या संकुलांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचा प्रकार उघड झाला आहे.शहरातील श्रीकृष्ण द्वार, श्रीराम द्वारसमोरील दोन व्यापारी संकुलांची पाहणी केल्यानंतर हे संकुले नशेखोरांचा दिवस-रात्र अड्डा असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे, तर पहिल्या माळ्यावर साड्या आणि महिलांच्या कापडाचे दोन मोठे प्रतिष्ठान आहेत. मात्र, दुसरा माळ्यावर जनावरांचा चारा भरण्यात आला असून, तब्बल ५० दुकाने भग्नावस्थेत आहेत. त्यानंतर चौथ्या माळ्यावर नशेखोरांचे बसण्याचे ठिकाण आहे. मुख्य बाजारपेठेत असलेल्या या व्यापारी संकुलामध्ये अवैध धंदेही चालत असल्याचे वास्तव आहे. यासोबतच जिल्ह्यातून पुणे, मुंबई, इंदूसह अनेक ठिकाणच्या खासगी बसेस प्रवाशांसाठी लागतात, त्या निमवाडी बसस्थानकाच्या वरच्या माळ्यावर दारू पिणाऱ्यांची मोठी चंगळ असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. टिळक रोडवरील त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्समध्ये आदिवासी मुलांचे वसतिगृह होते. मात्र, हे वसतिगृह हलविण्यात आल्यानंतर या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. याच संकुलात एका चिमुरड्या मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. या संकुलाची सुरक्षा व्यवस्था चोख असती, तर मुलीचे भविष्य वाचले असते. मात्र, सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे अनेक ठिकाणी अशाप्रकारचे अनैतिक प्रकार करणाऱ्यांना संधी मिळत आहे. त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला असलेले दोन कॉम्प्लेक्सही संशयास्पद असून, या संकुलांच्याही वरच्या माळ्यांवर अश्लील चाळे करणाऱ्यांची गर्दी असते. शहराच्या मुख्य बाजारपेठेतील संकुलांची ही भयावह परिस्थिती ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आली असली, तरी याकडे मात्र मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, तर पोलीस प्रशासनाकडून डोळेझाक करण्यात येत आहे. टिळक रोडवरील श्रावगी टॉवर्समध्ये काही वर्षांपूर्वी एका दरोडेखोर टोळीने दरोडा टाकला होता, याला विरोध करण्यासाठी गेलेल्या एका चौकीदाराची या टोळीने हत्या केली होती. त्यानंतर बहुतांश प्रतिष्ठानातील रोख रक्कम पळविण्यात आली होती. लाखो रुपयांची उलाढाल आणि करोडो रुपयांचे व्यवहार ज्या ठिकाणांवरून होतात, त्या ठिकाणची सुरक्षा एकाच चौकीदाराच्या खांद्यावर देण्यात येते, त्यामुळे हे असले अनैतिक प्रकार घडत असून, व्यापाऱ्यांनी एकजुटीने सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.संकुलाचे वरचे माळे बंद करा!शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या व्यापारी संकुलातील तिसऱ्या आणि चौथ्या माळ्यांवर कोणतेही कामकाज होत नसल्याने तसेच त्या माळ्यांवर व्यापारी प्रतिष्ठानही नसल्याने या ठिकाणावर जाण्याचे रस्ते बंद करावेत, अशी मागणी होत आहे. मुख्य बाजारपेठ वगळता अन्य ठिकाणच्या व्यापारी संकुलातील वरील माळ्यांवर जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.व्यापारी संकुलात ५० ट्रकच्यावर कुटार!मुख्य बाजारपेठेतील एका व्यापारी संकुलात तब्बल ५० ट्रकच्यावर कुटार भरण्यात आले. मोठ-मोठी प्रतिष्ठाने, मेडिकल शॉप, दैनिकाचे कार्यालय असलेल्या या व्यापारी संकुलात दुसऱ्या माळ्यावर मोठ्या प्रमाणात जनावरांचा चारा आणि कुटार ठेवण्यात आल्याने आश्यर्च व्यक्त करण्यात येत आहे. दुर्दैवाने आग किंवा यासारखी घटना झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविणेही कठीण आहे. खुल्या भूखंडासाठी पोलीस अधीक्षकांचा पुढाकारशहरातील खुल्या भूखंडांवर रात्रीच्या वेळी अवैध धंदे, अनैतिक चाळे करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी खुल्या भूखंडांवर ताराचे फेन्सिंग करण्यासाठी पुढाकार घेतला होता; मात्र हे भूखंड मनपा प्रशासनाच्या अखत्यारित असल्याने तसेच खासगी मालकीचे असल्याने पोलिसांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. शनिवारी घडलेल्या घटनेतून काही बोध घेऊन मनपा प्रशासनाने पुढाकार घेत व्यापारी संकुलांची सुरक्षा व्यवस्था आणि खुल्या भूखंडांवर ताराचे फेन्सिंग करणे बंधनकारक करावे.
व्यापारी संकुले बनली नशेखोरांचे अड्डे
By admin | Published: April 17, 2017 1:49 AM