अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकडाऊन विराेधात अकाेला शहरातील व्यापारी बुधवारी रस्त्यावर उतरले. टिळक राेड, काला चबुतरा, नेकलेस राेड, रणपिसे नगर या प्रमुख मार्गावरील व्यापाऱ्यांनी सकाळी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली तर नेकलेस राेडवर व्यापाऱ्यांनी धरणे आंदाेलन केले जिल्हाधिकारी यांनी व्यापाऱ्यांच्या भावना समजून घेत अनलाॅकची मागणी शासनाकडे पाठविताे, असे आश्वासन दिले
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मिनी लॉकडाऊन ऐवजी लाॅकडाऊनच लावण्यात आल्याचा आराेप व्यापाऱ्यांनी केला. प्रत्येक व्यापाऱ्याने काेराेना चाचणी केली आहे. काेराेना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची तजवीज केली आहे. तरीही व्यापार ठप्प करण्याची शासनाची भूमिका चुकीची असल्याचे मत यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. मनाेहर पंजवाणी यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली. त्यानंतर काला चबुतरा व्यापारी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन दिले. सिव्हील लाईन्स ते रतनलाल प्लाॅट चाैकादरम्यान नेकलेस राेड-रणपिसे नगर व्यापारी असाेसिएशनतर्फे व्यापाऱ्यांनी धरणे आंदाेलन केले. विशेष म्हणजे मंगळवारीच विदर्भ चेंबरने मिनी लॉकडाऊनला तीव्र विरोध दर्शविला हाेता. राज्य शासनाने लॉकडाऊनचे आदेश त्वरित रद्द करावेत, तसेच व्यापार बंद करण्याऐवजी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी विदर्भ चेंबर व व्यापारी संघटनांकडून करण्यात आली.
बाॅक्स
दुकाने उघडण्याची आशा
टिळक राेड, जुना कापड बाजार, नेकलेस राेड, जनता बाजार, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह ते फतेह चाैक व दीपक चाैक तसेच गांधी चाैक ते ताजनापेठ चाैकादरम्यान बुधवारी सकाळपासूनच बाजारपेठेत मजूर, कामगार दुकान उघडण्याच्या आशेवर प्रतीक्षा करीत बसून होते. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश आहे मात्र अनेक ठिकाणची बिगर अत्यावश्यक दुकानांचे शटर डाऊन असले तरी कुलूप मात्र लावण्यात आले नव्हते.