लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एप्रिल महिन्यापासून जिल्ह्याचा पारा वाढत आहे. सोमवारी जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याने उष्माघाताचा धोकाही वाढत आहे. उन्हापासून आरोग्य जपा, असा सल्ला वैद्यकीय अधिकाºयांनी दिला आहे.अंगाची काहिली करणाºया उष्णतेची दाहकता दिवसागणिक कमालीची वाढत आहे. परिणामी, जिल्हाभरात उष्माघाताच्या प्रमाणात वाढ होत असून, जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालये हाउसफुल्ल होत असल्याचे दिसून येते. गत आठवड्यापासून जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. आग ओकणाºया सूर्यामुळे जिल्हावासी होरपळत असून, नागरिकांनी आरोग्य जपावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, चक्कर येणे, भूक न लागणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, अस्वस्थता वाटणे, बेशुद्धावस्था येणे आदी उष्माघाताची लक्षणे असून, अशी लक्षणे आढळून येताच, संबंधित नागरिकांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तापमान ४१ अंश सेल्सिअसपेक्षा वर पोहोचल्याने आगामी काही दिवसात तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतो. वाढत्या उन्हाचा परिणाम जलस्रोतावरही होत आहे. अशी आहेत उष्माघाताची लक्षणेथकवा येणे, अंग तापणे, भूक न लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे, अस्वस्थ होणे, अचानक बेशुद्धी येणे, निरूत्साही होणे, रक्तदाब वाढणे, त्वचा कोरडी पडणे. असे करावे प्रतिबंधात्मक उपायवाढत्या उन्हात फार काळ कष्टाची कामे टाळावी, कष्टाची कामे सकाळी, संध्याकाळी अथवा तापमान कमी असेल तेव्हाच उरकावी, उष्णता शोषून घेणारे कपडे (काळे, लाल अथवा भडक रंगाचे) टाळावे, सैल व पांढºया रंगाचे कपडे वापरास प्राधान्य द्यावे, जलसंजिवनीचा वापर करावा, भरपूर पाणी व लिंबु साखर पाणी प्यावे, घराबाहेर पडताना कान व डोळे पांढºया रूमालाने झाकुन घ्यावे, डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनगॉगल्स वापरणे, बाहेरून आल्यावर डोळे थंड पाण्याने धुवून घ्यावे. आरोग्यासाठी हे टाळावे..उघड्यावरील पदार्थ खाऊ नये, लहान मुलांना जास्त थंड पदार्थ घेऊन देवू नये, तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळा, उन्हातून आल्याबरोबर थंड हवेत बसू नये, उपाशीपोटी घराबाहेर पडू नये, बाजारु शितपेयांचा अतिरेक टाळावा तसेच शरीराला पाण्याची कमतरता भासू नये म्हणून अधिक पाणी प्यावे, बाहेर फिरताना जवळ पाणी बाळगावे, लहान मुले व वृद्धांची दखल घ्यावी, सुती कापडाचा वापर करावा, फळाचा आहार वाढवावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
पारा ४१ अंशावर; उष्माघातापासून सावध राहण्याचा सल्ला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 1:42 PM