अकोला: मोठा गाजावाजा करीत सत्ताधारी भाजपने मार्च महिन्यात ‘ईईएसएल’ कंपनीसोबत ‘एलईडी’ पथदिवे लावण्याचा करारनामा केला. मागील काही दिवसांपासून देयकाअभावी एलईडीचा पुरवठा करण्यास कंपनीने हात आखडता घेतल्यामुळे पथदिव्यांची उभारणी रखडल्याचे चित्र आहे. देयक अदा करण्यापूर्वी मनपाने कंपनीला पथदिव्यांचा लेखाजोखा मागितला असता कंपनीचा गोंधळ उडाल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे सत्ताधारीच नव्हे, तर विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या डोक्याला नवीनच ताप लागल्याचे बोलल्या जात आहे.एलईडीचा लख्ख उजेड व त्यामुळे विजेची होणारी बचत ध्यानात घेता महापालिका स्तरावर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नगर विकास विभागाने केंद्र शासन प्रमाणित ‘ईईएसएल’ (एनर्जी इफिसिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) कंपनीची निवड केली. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये ईईएसएल कंपनीला पथदिवे उभारणीचा कंत्राट देण्यात आला आहे. मनपा क्षेत्रातील पथदिव्यांची एकूण संख्या, त्यावर खर्च होणारी वीज व त्या बदल्यात मनपाला प्राप्त होणारे वीज देयक आदी मुद्दे लक्षात घेता कंपनीसोबत करार करण्यात आला. कंपनीकडे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी स्वत:ची यंत्रणा नसल्यामुळे त्यांनी ही जबाबदारी ‘मिडास’ नामक कंपनीकडे सोपविली आहे. सुरुवातीला काही दिवस मिडास आणि स्थानिक कंत्राटदारांमध्ये पथदिव्यांच्या दरावरून बिनसले होते. सदर प्रकरण निस्तरल्यानंतर आता कंपनीने शहरात लावलेल्या सुमारे साडेदहा हजार पथदिव्यांच्या देयकाची प्रशासनाकडे मागणी केल्याची माहिती आहे.कंपनीने लेखाजोखा द्यावा!कंपनीच्यावतीने लावण्यात आलेल्या पथदिव्यांची ‘जिओ टॅगिंग’सह सर्व माहिती सादर करण्याचे मनपाने निर्देश दिले आहेत. त्यामध्ये खांब व पथदिव्यांची अचूक मोजदाद करण्याचाही समावेश आहे. या कामासाठी कंपनीची संथ गती पाहता देयक अदा करण्याची प्रक्रिया रखडली आहे. परिणामी, कंपनीकडूनही एलईडीचा पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती आहे.खांब उभारले; पथदिवे कधी लावणार?सत्ताधारी भाजपसह इतर राजकीय पक्षाच्या नगरसेवकांनी उत्साहाच्या भरात प्रभागांमध्ये खांब उभारले. एलईडी पथदिव्यांमुळे कसा उजेड पडेल, याचे नागरिकांकडे गुणगान केले. मागील सहा महिन्यांपासून सदर खांबांवर पथदिवे लागलेच नसल्यामुळे नागरिकांना सामोरे जाताना नगरसेवकांची चांगलीच कोंडी होत आहे. सत्तेत असल्यामुळे भाजप नगरसेवकांच्या प्रभागात पथदिव्यांचा मुहूर्त नेमका कधी निघतो, असा खोचक सवाल अकोलेकरांकडून विचारला जात आहे.
रॉयलच्या पथदिव्यांचा बोजवारा!एलईडी पथदिव्यांसाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने १० कोटींचा निधी दिला. यामध्ये मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटी रुपये जमा करीत एकूण २० कोटी रुपयांतून एलईडी पथदिवे उभारण्यासाठी रॉयल इलेक्ट्रॉनिक कंपनी (पुणे)ची नियुक्ती केली. यामध्ये शहरातील मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश आहे. एकीकडे एलईडीच्या लख्ख उजेडाचे कौतुक केले जात असले तरी दुसरीकडे मागील सहा महिन्यांच्या कालावधीत रॉयल कंपनीने उभारलेल्या पथदिव्यांची यंत्रणा पूर्णत: कोलमडल्याची परिस्थिती आहे.