पारस : गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक कुटुंबातील आई आणि वडील यांचे निधन झाल्याने त्या कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाची मोठी जबाबदारी नातेवाईकांवर आली आहे. अशा निराधार पाल्यांना आधार देण्यासाठी मेस्टाने पुढाकार घेतला आहे.
गेल्या वर्षभरापासून सर्वच प्रकारच्या व्यवसायांना लॉकडाऊन काळात घालण्यात आलेली बंदी आणि त्यामुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था, यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा कुटुंबातील पाल्यांचा शैक्षणिक आधार म्हणजेच आईवडील आणि ते जर मृत्यू पावले असतील तर या निराधार विद्यार्थ्यांचा वाली कोण असा यक्षप्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा राहिला आहे. या सर्व बाबींचा विचार करून कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्यू पावलेल्या आई-वडिलांच्या पाल्यांना महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून निराधार पाल्यांना सर्वच शाळेमध्ये मोफत प्राथमिक शिक्षण देण्याचा निर्णय मेस्टा संघटनेने घेतला आहे. मेस्टा अंतर्गत येणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये या निराधार मुलांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी मेस्टाने स्वीकारली आहे.
मेस्टा संघटना एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सदर विद्यार्थ्यांचा शाळेचा येणारा पूर्ण खर्च सुद्धा स्वतः करणार आहे. त्यामध्ये वर्षभरासाठी लागणारी सर्व शालेय साहित्य व शाळेचे कपडे व इतर साहित्य यांचा पुरवठासुद्धा केल्या जाणार आहे.
-साहेबराव पाटील भरणे, जिल्हाध्यक्ष, मेस्टा संघटना