अकोला : वेळ शनिवारी सायंकाळी ७.५० मिनिटांची... उन्हाळा असल्यामुळे आकाश अगदी निरभ्र असतं...अशातच अचानक आसमंतात उत्तरेकडून दक्षिणकडे जाणारे आगीचे गोळे दिसतात. केवळ अकोलाच नव्हे, तर लगतच्या जिल्ह्यांमध्येही असाच नजारा पहावयास मिळाल्याची वार्ता पसरते व व्हिडिओ व्हायरल होतात. हा सर्व प्रकार शनिवारी घडला व अनेकांनी हा नजरा याची देही याची डोळा अनुभवला. परंतु हा उल्कापात की धूमकेतू की कृत्रिम उपग्रहाचे तुकडे की आणखी काही, हे कोडे मात्र उलगडू शकले नाही. आकाशात उल्कापिंडसदृश आगीचे गोळे अनेकांनी पाहिले. या गोळ्यांना पुच्छ असल्यामुळे हे बहुधा धूमकेतू असावेत, असेही अनेकांना वाटले. कुणाला तर क्षेपणास्त्र असल्याचीही शंका आली. अगदी काही सेकंदासाठी हे आगीचे गोळे आसमंतात तरंगताना आढळून आले व अचानक अदृश्य झाले. अनेकांनी हा नजारा मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केला व त्यानंतर सर्वत्र व्हिडिओ व्हायरल झाले. दरम्यान, हा उल्कापात नसून, एखाद्या कृत्रिम उपग्रहाचे तुकडे होऊन ते पृथ्वीच्या कक्षेत आले असावेत, अशी शक्यता खगोल अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये झाले दर्शन
आकाशातून अग्नीगोळे पडल्याचे दृश्य केवळ अकोला जिल्ह्यातच नव्हे, तर लगतच्या बुलडाणा, यवतमाळ, अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अनेकांना हे दृश्य पाहिल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील भुसावळसह इतर ठिकाणीही हा प्रकार पहावयास मिळाल्याचे सांगण्यात आले.
काय म्हणतात अभ्यासक?
सायंकाळी आसमंतात दिसलेला प्रकार हा उल्कापात नसावा, कारण उल्का वेगाने खाली येतात. निकामी झालेल्या कृत्रिम उपग्रहावर लघुग्रह आदळून त्याचे तुकडे झाले असावेत व काही तुकडे पृथ्वीच्या गुरुत्चाकर्षणामुळे ते पृथ्वीच्या कक्षेत आले असावेत.
- प्रभाकर दोड, खगोल अभ्यासक, अकोला
हा उल्कापाताचा प्रकार म्हणता येणार नाही, कारण उल्का अशाप्रकारे प्रवास करत नाहीत. याला उपग्रही म्हणता येत नाही कारण उपग्रहाला पुच्छ नसते. त्यामुळे शनिवारी सायंकाळी आकाशात दिसलेली वस्तू नेमकी काय होती, हे सद्या तरी सांगता येणार नाही.
- प्रा. नितीन ओक, विज्ञान अभ्यासक, अकोला