संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संगणक, रोबोट आणि ड्रोनच्या स्पीडने कार्य करणारे कर्मचारी अकोल्यात कार्यरत असून, एका दिवसात म्हणजे ड्युटीच्या आठ तासांत (४८0 मिनिट) ६00 ग्राहकांच्या वीज मीटरचे रिडिंग घेण्यात आले आहे. ही किमया अकोला शहर विभागात दिसून आली असून, महावितरणच्या आयटी विभागासाठी हा प्रकार संशोधनाचा ठरतो आहे. अकोला शहरातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत असल्याच्या तक्रारी अधूनमधून येत असतात. या तक्रारींचा मागोवा घेत मध्यंतरी ‘लोकमत’ने वृत्त मालिका प्रकाशझोतात आणली. बसल्या ठिकाणाहून मीटर रिडिंग केले जात असल्याचा प्रकार समोर आला. तेव्हा अकोल्यातील महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांना आयटी विभागाकडून चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, हा प्रकार नंतर बंद झाला; पण काही महिने होत नाही, तोच पुन्हा शहरात ही धूळफेक सुरू झाली आहे. महावितरणचे कार्यालय असलेल्या दुर्गा चौक भागातच सहाशे ग्राहकांना याचा फटका सोसावा लागला आहे. ९0 टक्के बिलिंग करण्याच्या वरिष्ठांच्या आदेशाच्या अंमलबजावणीतून अकोला शहर विभागाने हॅन्ड हॅडल युनिट पद्धतीचे वीज बिल आकारणीत हा घोळ करून ठेवला आहे. २0७११ आणि २0७१२ लॅटीटूट आणि लॉगीट्यूटमधील सर्व्हरमध्ये ही छेडछाड करण्यात आली आहे. १४ सप्टेंबर १७ रोजी केलेल्या या परिसरातील मीटर रिडिंगमध्ये हा प्रकार उजेडात येत आहे. दुर्गा चौक ते रतनलाल प्लॉट परिसरातील सहाशे ग्राहकांचे मीटर रिडिंग दाखविले गेले आहेत. मीटर रिडिंग करणार्या कर्मचार्यांचे कामाचेताससकाळी दहा ते सहापर्यंत जरी पकडले, तरी ४८0 मिनिट होतात. मीटर रिडिंग करणार्या कर्मचार्याने या सेकंदाच्या पलीकडे जाऊन मीटर रिडिंग घेतले आहे. त्याने ४८0 मिनिटांत ६00 ग्राहकांचे मीटर रिडिंग केले. सेकदांपेक्षाही अधिक वेगाने कार्य करणार्या या कर्मचार्याने संगणक, रोबोट आणि ड्रोनच्या स्पीडलाही मागे टाकले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अकोल्यातील ग्राहकांच्या डोळ्यात महावितरणकडून धूळफेक केल्या जात असून, बसल्या ठिकाणाहून मीटर रिडिंग केले जात आहे.
वीज मीटर रिडिंग करणार्या कंत्राटी एजन्सीवर आमचे पूर्ण लक्ष आहे. आमची यंत्रणाही रिडिंग करीत, वेळोवेळी आयटी विभागाकडून अकस्मात तपासणीही केल्या जाते. एजन्सीच्या गटबाजीतून अनेकदा तक्रारी होतात; मात्र ते जर खरे असेल, तर गंभीर आहे. चौकशीत तसे समोर आले, तर कारवाई करण्यात येईल.-धर्मेंद्र मानकर, शहर अभियंता, महावितरण अकोला.