लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील वीज ग्राहकांचे फोटो मीटर रीडिंगचे कंत्राट स्वतंत्र एजन्सीला दिलेले असतानाही अकोला शहरात हे काम लाइनस्टॉफ कर्मचार्यांना देण्यात येत आहे. आधीच कामाचा व्याप असतानाही हे अतिरिक्त काम देण्यात आल्यामुळे इलेक्ट्रिसिटी लाइनस्टाफ असोसिएशनने कठोर भूमिका घेतली असून, फोटो मीटर रीडिंगच्या कामातून मुक्तता न केल्यास येत्या २१ जूनपासून काम बंदचा इशारा दिला आहे. महावितरणच्या अकोला शहर विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी लाइनस्टाफ कर्मचार्यांना फोटो मीटर रीडिंगच्या कामास जुंपले आहे. मीटर रीडिंगचे काम महिला बचत गट, महिला मंडळ, महिला स्वयंसेवी संस्था यांना कंत्राटावर देण्यात यावे, असे आदेश असतानाही मीटर रीडिंगसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीच्या अंतर्गत वादामुळे हे काम महावितरणच्या कर्मचार्यांना देण्यात आले आहे. लाइनस्टाफ कर्मचार्यांना आधीच अतिरिक्त काम देण्यात आले आहे. यामुळे फोटो मीटर रीडिंगचे अतिरिक्त कामातून मुक्त केले नाही, तर लाइनस्टाफ कर्मचारी येत्या २१ जूनपासून काम बंद आंदोलन छेडतील, असा इशारा संघटनेचे वसंत धर्मे, धनराज हिवरे, सचिन केतकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकार्यांनी अधीक्षक अभियंत्यांना दिला आहे.
मीटर रीडिंग; कर्मचा-यांचा काम बंदचा इशारा
By admin | Published: June 20, 2017 4:48 AM