अकोला : शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकी, मदतनिसांना विविध बाबींचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शिक्षण विभागाकडून राबविला जात आहे. त्यासाठी प्रशिक्षण साहित्य निर्मितीला निधीही देण्यात आला आहे.राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, डायटचे प्राचार्य यांच्यासमवेत अलिबाग येथे झालेल्या शिक्षण परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. पोषण आहारासंदर्भात विविध मुद्यांच्या चर्चेनंतर स्वयंपाकी, मदतनिसांना प्रशिक्षण देण्याचे ठरले. त्यानुसार केंद्रस्तरीय शाळेत स्वयंपाकी, मदतनिसांना प्रशिक्षण देण्याचा आदेश देण्यात आला. प्रशिक्षण खर्चाबाबतच्या मार्गदर्शक सूचना शालेय पोषण आहार कक्षाकडून ठरविण्यात आल्या. स्वयंपाकी, मदतनिसांच्या प्रशिक्षणासाठी प्रति १०० रुपये दिले जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेला एक लाख रुपये निधी प्रशिक्षण साहित्यासाठी मिळणार आहे. त्या प्रशिक्षण साहित्यातून मास्टर्स ट्रेनर्स तयार केले जातील. त्यांच्यामार्फत शाळांमध्ये कार्यरत स्वयंपाकी, मदतनिसांना प्रशिक्षण दिले जाईल. केंद्र किंवा बीट स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
या बाबींचे दिले जाईल प्रशिक्षणस्वयंपाकी, मदतनीस यांची वैयक्तिक स्वच्छता कशी असावी, धान्यसाठा कक्ष व स्वयंपाकगृहाची स्वच्छता ठेवणे, अन्न शिजविण्याची आदर्श कार्यपद्धती व अन्न शिजविताना घ्यावयाची काळजी, शिजविलेल्या अन्नाचे विद्यार्थ्यांना वाटप करणे, त्यानंतर भांडी व परिसर स्वच्छ करणे, तांदूळ, धान्यादी मालाची साठवणूक व स्वच्छता करणे, इतरही महत्त्वाच्या बाबींची माहिती प्रशिक्षण कार्यक्रमात दिली जाणार आहे.