- आशिष गावंडे
अकोला : महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या निकषानुसार आठवड्याचे सहा दिवस आहार पुरवठा होणे अपेक्षित असताना त्याचा फज्जा उडाल्याचे चित्र नगरसेवकांच्या तपासणीत समोर आले. विद्यार्थ्यांना मेन्यूप्रमाणे आहार पुरवठा होत नसल्यामुळे शाळेचे संबंधित मुख्याध्यापक व महिला बचत गटांचे पितळ शुक्रवारी उघडे पडले.महापालिकेतील शिक्षण विभागाच्या बेताल कारभारामुळे शिक्षकांच्या मनमानी कामकाजाला ऊत आला आहे. शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांचा मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर कवडीचाही वचक नसल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात सापडले आहे. मनपा शाळांवर शिकवणीसाठी चक्क नातेवाइकांना बोलावल्या जात असल्याचा प्रकार जुने शहरातील उर्दू मुलांची शाळा क्रमांक चार व उर्दू मुलींची शाळा क्रमांक १० मध्ये उघडकीस आला होता. शुक्रवारी महापालिकेच्या सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार, महिला व बालकल्याण सभापती सारिका जयस्वाल, माजी महापौर सुमनताई गावंडे, नगरसेवक सतीश ढगे, तुषार भिरड, शशी चोपडे यांनी पश्चिम झोन अंतर्गत मनपा शाळांची तपासणी केली. मनपा शाळा क्रमांक एकमध्ये जाऊन नगरसेवकांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. महिला बचत गटाकडून होणारा शालेय पोषण आहार पुरवठ्यातील खिचडीचा नगरसेवकांनी आस्वाद घेतला असता अन्न कमी शिजल्याचे आढळून आले.पालक सभेला ठेंगामनपा शाळा क्रमांक एकमध्ये जुलैपासून ते आजपर्यंत एकही पालक सभा आयोजित केली नसल्याचे नोंदवहीची तपासणी केली असता आढळून आले. या सर्व प्रकारांची माहिती भाजप पदाधिकाºयांनी महापौर विजय अग्रवाल यांना दिली असता कामचुकार मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाई करण्याचे संकेत महापौरांनी दिले.