अकोला : एम.आय.डी.सी. चे विभागीय कार्यालय अकोला येथे सुरू करण्यासाठी सकारात्मक पावले उचलू व अकोल्यातील उद्योजकांच्या समस्या निराकरणासोबतच भूखंड प्राप्तीतील अडीअडचणी दूर करणे, तसेच गुजरातच्या धर्तीवर सुख-सुविधा व सरळीकरण करण्यासाठी युती शासन कटिबद्ध असल्याचे अभिवचन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आमदार गोवधन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांना दिले. एम.आय.डी.सी. चे विभागीय कार्यालय अकोला येथे व्हावे, यासाठी आमदार गोवर्धन शर्मा सतत ८ वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार शर्मा आणि आमदार सावरक र सातत्याने या मागणीचा पाठपुरावा करत असून एम.आय.डी.सी.च्या अडीअडचणीसंबंधी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे तगादा लावला आहे. गुरुवारी नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार शर्मा व आमदार सावरकर यांनी ना. देसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विभागीय कार्यालयाबाबत निर्णय घेऊन सन २0१६ मध्ये अकोला, वाशिम, बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या विकासासाठी विभागीय कार्यालय भेट म्हणून द्यावे, असे साकडे घातले. यावर ना. देसाई यांनी कार्यालयासोबत अडी-अडचणी व नवीन उद्योग धंद्यांसाठी सरळीकरण प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तसेच बेरोजगारांना रोजगार, नवीन उद्योग उभारणीस पाठबळ देण्यासाठी भाजपा-सेना युती सरकार कटिबद्ध असल्याचे अभिवचन आमदारद्वय शर्मा व सावरकर यांना दिले. या शिवाय आमदार शर्मा आणि आमदार सावरकर यांनी आयुर्वेदिक महाविद्यालयातील कर्मचार्यांच्या समस्या सोडविण्याबाबत तसेच अकोला येथे बांधकाम विभागाच्या वास्तुशास्त्र कार्यालयाच्या मागणीसंदर्भात विशेष प्रयत्न केले.
‘एमआयडीसी’चे विभागीय कार्यालय होणार अकोल्यात
By admin | Published: December 11, 2015 2:38 AM