नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बाइकवर फिरण्याची आवड तर सगळ्यांनाच असते. काहीजण महिन्याअखेरीस जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देतात, तर काही अधूनमधून ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात; मात्र काहीजण आपल्या भ्रमंतीसाठी, बाइक सवारीच्या आवडीसाठी जगभर फिरण्याची आकांक्षा मनी बाळगतात. मिलिंद धनराज मेश्राम त्यापैकीच एक. मिलिंद हा शिवछत्रपतींच्या विचारांना आणि त्यांना आदर्श मानणारा युवक. शिवजयंती साजरी करण्यासाठी तो नागपूरहून थेट दुचाकीने शिवनेरी गडाकडे निघाला आणि तेथून तो लखनऊला निघेल. नागपूरहून निघालेला मिलिंद मेश्राम रविवारी शिवनेरीला जाण्यासाठी काही वेळ अकोल्यात थांबला होता. यावेळी त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला आणि बाइक सवारीविषयी त्याने माहिती दिली. मिलिंदने आपल्या बाइकवर आतापर्यंत सव्वा लाख किलोमीटर प्रवास केला असून, लेह, लड्डाखसह, पानिपत, उत्तर व दक्षिण भारत दुचाकीवर पालथा घातला आहे. वर्षातील दोन महिने नुसते बाइकवर फिरण्यासाठी तो राखीव ठेवतो. मिलिंद हा नागपूर शहरात एक रेस्टॉरंट चालवितो. मिलिंदला लहानपणापासून भटकंतीचे वेड. तारुण्यात हातात दुचाकी आली आणि त्याच्या आवडीला वेगाचे पंख मिळाले. गेली दोन दशके मिलिंद मेश्राम याची बाइक सफर अव्याहत सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणार्यांपैकी एक असलेला मिलिंद..शिवरायांच्या गडकिल्ल्यांची भ्रमंतीसुद्धा त्याने बाइकवरच पूर्ण केली. छत्रपती शिवरायांचा कुठेही कार्यक्रम असो मिलिंद बाइकसह त्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतो. १९ फेब्रुवारी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवनेरीवर शिवजयंती जल्लोषात साजरी होते. शिवनेरीवर होणार्या शिवजयंती सोहळय़ात सहभागी होण्यासाठी मिलिंद हा नागपूरपासून ७0१ किमी अंतरावर असलेल्या शिवनेरी गडावर बाइकवर निघाला.
शिवजयंतीसाठी लखनऊला जाणार!उत्तर प्रदेश मराठा समाजाच्यावतीने शिवनेरी किल्ला ते लखनऊपर्यंत अशी १४५७ किमीची बाइक रॅली काढण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी ही बाइक रॅली शिवनेरीवरून निघणार आहेत. ही रॅली १९ फेब्रुवारी रोजी लखनऊला पोहोचेल. या बाइक रॅलीमध्येसुद्धा मिलिंद मेश्राम सहभागी होणार आहे. या रॅलीमध्ये महाराष्ट्रातील एकूण १७0 युवक सहभागी होणार आहेत. लखनऊ येथे मोठय़ा उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.